परदेशात करोना लस घेतलेल्यांना भारतात घेता येणार बुस्टर डोस

ज्या भारतीय किंवा परदेशी नागरिकांनी कोविड १९ लसीचा डोस भारताबाहेर घेतला आहे त्यांना दुसरा डोस किंवा बुस्टर डोस भारतात घेता येईल असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर कली आहे. राष्ट्रीय तंत्र सल्ला समूह, एनटीएजीआयने तशी शिफारस केली असल्याचे समजते. आजपर्यंत परदेशात करोना लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतलेल्यांना भारतात दुसरा डोस किंवा बुस्टर डोस घेण्यात अडचणी येत होत्या. याचे मुख्य कारण म्हणजे भारताने लसीकरणासाठी विकसित केलेले कोविन पोर्टल कुठल्याच विदेशी लसीकरण पोर्टलशी जोडलेले नव्हते. त्यामुळे ज्या नागरिकांना दुसरा डोस किंवा बुस्टर डोस भारतात घेण्यास अडचणी आल्या त्यांच्या साठी ही नवी सुविधा देता यावी यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने हा मोठा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य सचिव यांना पत्रे रवाना केली असून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यात कोविन पोर्टल मध्ये आवश्यक ते बदल करण्याचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाकडे अनेक भारतीय आणि परदेशी नागरिकांनी करोना लस दिली जावी यासाठी पत्रे लिहून मागणी केली होती. देशाच्या स्वतंत्राचा अमृत महोत्सव साजरा होत असताना देशात १५ जुलै पासून पुढे ७५ दिवस मोफत लसीकरण सुरु केले गेले आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून लाखो नागरिकांना त्याचा फायदा झाला आहे. या मोहिमेमुळे बुस्टर डोसची मागणी वाढल्याचे दिसून आले आहे.