धर्मनगरी वाराणसीची ही आहेत वैशिष्टे

देशातील सर्वाधिक प्रवासी भेट देणाऱ्या शहरात धर्मनगरी वाराणसी खूपच वरच्या क्रमांकावर आहे. या शहराला केवळ भारतीयच नाही तर परदेशी प्रवासी सुद्धा मोठ्या प्रमाणावर भेट देतात. वाराणसी शहराची अनेक नावे आहेत. काशी, बनारस, सुदर्शन, रम्या, ब्रह्मवर्त अश्या अनेक नावाने या नगरीचे विविध ठिकाणी उल्लेख येतात. या नगरीची अनेक वैशिष्टे आहेत. पवित्र गंगा नदी, मंदिरे, पारंपारिक घरे, भगवान शिवाचे निवासस्थान, अनेक कलाकुसर वस्तूंचे बाजार, विविध धातूंची खास भांडी, बनारसी सिल्क आणि येथील घाट हे त्यातील काही मुख्य.

पण त्याचबरोबर या शहरात आशियातील सर्वात मोठे हिंदू विश्वविद्यालय आहे तसेच शेवटचा श्वास या नगरीत घेऊन मोक्ष मिळविण्याची इच्छा पूर्ण करणारे मुक्ती भवन नावाचा आश्रम सुद्धा आहे. त्याला ‘डेथ हॉटेल’ असेही म्हटले जाते. मृत्युच्या दारात पोहोचलेल्या व्यक्ती येथे १५ दिवस राहू शकतात. पण त्या काळात मृत्यू आला नाही तर मात्र येथून बाहेर पडावे लागते. काशी हे साहित्याचे माहेरघर मानले जाते. येथे कवी तुलसीदास आणि मुन्शी प्रेमचंद राहत होते.

या नगरीत किमान २३ हजार मंदिरे असून ती पाहणे हा वेगळाच अनुभव आहे. वरुणा आणि असी या दोन नद्याच्या संगमावरून या नगरीला वाराणसी असे नाव पडले आहे. शिवाच्या त्रिशुलावर ही नगरी वसली आहे अशी मान्यता आहे. येथे शिवाच्या १२ ज्योतिर्लिंग मधील एक असलेले काशी विश्वेश्वर मंदिर असून ही जागा कधीच लुप्त होणार नाही असे म्हटले जाते.