अयोध्या राममंदिरात वापरल्या जात आहेत खास विटा

अयोध्येच्या राममंदिराचे काम जोरात सुरु आहे. या मंदिरासाठी खास प्रकारच्या विटा वापरल्या जात आहेत. गर्भगृह आणि मंदिराच्या बाहेरच्या भिंतींसाठी या विटांचा वापर केला जात आहे. या विटांमध्ये तीन खास भोके आहेत. बांधकाम करताना त्यात खास प्रकारचे रसायन भरले जाते. यामुळे गर्भगृहाचे तापमान कमी राहीलच पण मंदिराला अधिक मजबुती प्राप्त होणार आहे. अयोध्येतील राममंदिर किमान १ हजार वर्षे चांगल्या स्थितीत राहिले पाहिजे यासाठी खास प्रयत्न केले जात आहेत आणि त्यादृष्टीने बांधकाम तज्ञांचा सल्ला घेऊन काम केले जात आहे. मंदिराला मजबुती देणाऱ्या या विटा त्याचाच एक भाग असून त्या चंडीगड मधून आणल्या गेल्या आहेत.

मंदिराचे बांधकाम बन्सी पहाडपूर येथून आणलेल्या पिंक स्टोन मध्ये केले जात आहे. मात्र बाहेरच्या भिंती आणि गर्भगृहाच्या बांधकामात दगडांच्या मध्ये या खास विटा वापरल्या जात आहेत. डिसेंबर २०२३ पर्यंत मंदिराचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे. लार्सन टुब्रो आणि टाटा कन्सल्टन्सी एकमेकांच्या सहकार्याने हे काम करत आहेत. या कंपनीचे इंजिनीअर्स सांगतात, चंदिगढ मधून आणल्या गेलेल्या विटाना तीन मोठी भोके आहेत. त्यात रसायन भरले गेले कि भिंतीना अधिक मजबुती येते शिवाय बाहेर हवामान उष्ण असले तरी आतील भागात तापमान थंड राहते.