27 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल द्रविडची यूएईला जाण्यापूर्वी कोविड-19 चाचणी करण्यात आली होती. राहुल द्रविडच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण आशिया चषकाच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावताना दिसणार आहे.
राहुल द्रविडला कोरोनाची लागण, लक्ष्मण निभावू शकतो मुख्य प्रशिक्षकाची भूमिका
रिपोर्ट्समध्ये असाही दावा केला जात आहे की, राहुल द्रविड कदाचित आशिया कपमधूनच बाहेर जाऊ शकतो. मात्र, बीसीसीआयकडून राहुल द्रविडबाबत अद्याप कोणतेही अधिकृत अपडेट जारी करण्यात आलेले नाही. यापूर्वी व्हीव्हीएस लक्ष्मणला झिम्बाब्वे दौऱ्यावर मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडवरील कामाचा बोजा सांभाळण्यासाठी पाठवण्यात आले होते.
राहुल द्रविडच्या अनुपस्थितीत व्हीव्हीएस लक्ष्मण मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावणार आहे. लक्ष्मण सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख आहेत. इतकेच नाही तर लक्ष्मण गेल्या तीन महिन्यांपासून टीम इंडियाशी जोडला गेला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यातही लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक होता.
लक्ष्मणला आहे चांगला विशेष अनुभव
यानंतर व्हीव्हीएस लक्ष्मणला मुख्य प्रशिक्षक म्हणून आयर्लंड दौऱ्यावर पाठवण्यात आले. इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यातही लक्ष्मण मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत होता. लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक असताना टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत झिम्बाब्वेचा 3-0 असा पराभव केला.
आशिया कपसाठी टीम इंडिया मंगळवारी यूएईला रवाना होणार आहे. मात्र, राहुल द्रविड टीम इंडियासोबत यूएईला रवाना होणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण झिम्बाब्वेहून यूएईला आलेल्या खेळाडूंसह आशिया कपसाठी टीम इंडियामध्ये सामील होऊ शकतो.
आशिया चषक स्पर्धेतील टीम इंडियाची मोहीम 28 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. संघाला पहिल्या सामन्यात पाकिस्तानसारख्या बलाढ्य संघाचा सामना करावा लागणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघासाठी हे आव्हान सोपे असणार नाही.