या शहरातून राहतात जगातील ६०० अब्जाधीश

फोर्ब्स तर्फे दरवर्षी जशी जगातील धनकुबेरांची यादी प्रसिद्ध केली जाते तसेच सर्वाधिक अब्जाधीश कोणत्या शहरातून राहतात त्या शहरांची यादी सुद्धा प्रसिद्ध होते. जगात आज अब्जाधीशांची संख्या करोना काळात सुद्धा वाढत चालल्याचे दिसते आहे. मात्र सुमारे ६०० अब्जाधीश जगातील १० शहरात राहत आहेत. यातील ३ शहरे चीन मधली, दोन अमेरिकेतील तर एक भारतातील आहे.

सर्वाधिक अब्जाधीश राहणाऱ्या शहरात पहिल्या क्रमांकावर अमेरिकेचे न्यूयॉर्क शहर आहे. येथे १०६ अब्जाधीश आहेत आणि त्यांची एकूण संपत्ती आहे ६३८.४ अब्ज डॉलर्स. त्यापाठोपाठ चीनची राजधानी बीजिंग आहे. येथे राहणाऱ्या अब्जाधीशांची संख्या ८३ असून एकूण संपत्ती आहे ३१० अब्ज डॉलर्स. त्यापाठोपाठ चीनच्या अधिपत्याखाली असलेल्या हॉंगकॉंगचा नंबर आहे. येथे ६७ अब्जाधीश आहेत आणि त्यांची एकूण संपत्ती आहे ३००.७ अब्ज डॉलर्स.

चार नंबरवर ब्रिटनची राजधानी लंडन आहे. येथे ६५ अब्जाधीश आहेत. त्यांची एकूण संपत्ती आहे ३२३ अब्ज डॉलर्स आहे. पाच नंबरवर चीनची आर्थिक राजधानी शांघाई आहे. येथे ६१ अब्जाधीश आहेत तर शेंजेन शहरात ५९ अब्जाधीश आहेत. सातवा नंबर मास्कोचा आहे. येथे ५२ अब्जाधीश आहेत आणि त्यांची एकूण संपत्ती आहे २१७.५ अब्ज डॉलर्स.

भारताची आर्थिक राजधानी मुंबई या यादीत आठव्या स्थानी असून येथे ५१ अब्जाधीश आहेत. त्यांची एकूण संपत्ती ३०१.३ अब्ज डॉलर्स आहे. नऊ नंबरवर सॅन फ्रान्सिस्को असून येथे ४५ तर दहाव्या क्रमांकावर असलेल्या द. कोरियाच्या सोल शहरात ३८ अब्जाधीश आहेत.