देशात लवकरच सुरु होणार नवी ११४ आधार सेवा केंद्रे

युआयडीएआयने देशाच्या ५३ शहरात लवकरच नवी ११४ आधार सेवा केंद्र सुरु केली जात असल्याचे जाहीर केले आहे. देशात सध्या अशी ८८ केंद्रे कार्यरत आहेत. शिवाय देशभरात ३५ हजार आधार सेन्टर्स, बँका, पोस्ट, बीएसएनएल ऑफिस अश्या ठिकाणी राज्य सरकारतर्फे चालविली जात आहेत. आधार कार्ड हा नागरिकासाठी एक महत्वाचा दस्तावेज असून अनेक कामांची पूर्तता करण्यासाठी आधार कार्डची गरज असते. त्यामुळे नागरिकांना सहज आणि सुलभतेने आधार कार्ड मिळावी आणि आधार कार्ड मध्ये काही दुरुस्ती किंवा बदल करायचे असतील तरी त्यांची सुविधा मिळावी म्हणून नवी ११४ सेवा केंद्रे सुरु केली जाणार आहेत. सध्या अस्तिवात असलेली ८८ आणि नव्याने सुरु होणारी ११४ केंद्रे आठवड्याची सर्व दिवस, अगदी रविवारी सुद्धा सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच पर्यंत सुरु राहणार आहेत.

नवी सेवा केंद्रे मेट्रो आणि मोठ्या शहरात आणि सर्व राज्यांच्या राजधान्या मध्ये सुरु होणार असल्याचे युआयडीएआयने जाहीर केले आहे. आधार कार्ड शी संबंधित सर्व कामे या एकाच केंद्रात होऊ शकणार आहेत. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी या केंद्रांवर विशेष सुविधा आहेत.

राज्य सरकार तर्फे चालविल्या जात असलेल्या बँक, पोस्ट आणि अन्य ठिकाणच्या सेवा केंद्रात नवीन कार्ड नोंदणी, नाव, पत्ता बदल, मोबाईल नंबर, ईमेल पत्ता दुरुस्ती, जन्म तारीख दुरुस्ती अशी कामे होतात तसेच फोटो, फिंगरप्रिंट सारखी सर्व बायोमेट्रिक वा अन्य बदल करता येतात. त्यासाठी ठराविक शुल्क आकारले जाते. अधिक शुल्काची मागणी केली गेल्यास नागरिक युआयडीएआयच्या वेबसाईट किंवा १९४७ नंबर वर फोन करून तक्रार नोंदवू शकतात. लहान मुलांचे ५ वर्षानंतर आणि पुन्हा १५ वर्षानंतर बायोमेट्रिक अपडेट करावे लागते पण त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही असे युआयडीएआयने स्पष्ट केले आहे.