दिग्गज क्रिकेटपटूंची मुले टीम इंडियाच्या उंबरठ्यावर
डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, अॅक्टर चा मुलगा अॅक्टर, राजकारण्याचा मुलगा राजकारणी तसेच खेळाडूंची मुले खेळाडू अशी आपल्याकडे साधारण प्रथा दिसते. टीम इंडियाच्या उंबरठ्यावर सध्या अशीच काही दिग्गज क्रिकेटपटूंची मुले उभी असून लवकरच त्यांची टीम इंडिया मध्ये एन्ट्री होऊ शकते असे अंदाज वर्तविले जात आहेत.
अर्थात क्रिकेटरच्या मुलाची क्रिकेट मध्ये एन्ट्री ही नवलाची बाब नाही. यापूर्वी लाला अमरनाथ यांची सुरिंदर आणि मोहिंदर तसेच लिटील मास्टर सुनील गावस्कर यांचा मुलगा रोहन ही त्याची ठळक उदाहरणे आहेतच. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुन गेली काही वर्षे व्यावसायिक क्रिकेट खेळत आहे. त्याने आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स कडूनही खेळ केला आहे. प्रामुख्याने अर्जुन गोलंदाजी करतो आणि त्यात त्याने चांगली प्रगती दाखविली तर त्याची लवकरच टीम इंडिया मध्ये एन्ट्री होऊ शकते.
संजय बांगर यांनी टीम इंडियासाठी केवळ १२ कसोटी आणि १५ वन डे खेळल्या असल्या तरी प्रशिक्षक म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यांचा मुलगा आर्यन याने कूचबिहार करंडक स्पर्धेत चांगले प्रदर्शन केले आहे आणि सध्या तो इंग्लिश कौंटी ज्युनियर टीम बरोबर करारबद्ध आहे. ऑलराउंडर आर्यन लवकरच टीम इंडिया मध्ये दिसेल असे म्हटले जात आहे.
टीम इंडियाचा माजी कप्तान आणि प्रशिक्षक राहुल द्रविड याने अनेक वर्षे उत्तम दर्जाचे क्रिकेट खेळले आहे आणि त्याचे कोट्यावधी चाहते आहेत. द्रविडचा मुलगा समित वडिलांच्या पावलावर पाउल टाकून वाटचाल करतो आहे. त्याने अंडर १२ स्पर्धेत त्याच्या शाळेकडून स्पर्धेत ३ अर्धशतके, तसेच २०१९ मध्ये कर्नाटक स्टेट क्रिकेट ज्युनियर लीग मध्ये द्विशतक, आणि नाबाद ९४ तसेच ३ विकेट घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याची वर्णी लवकरच टीम इंडिया मध्ये लागेल असे म्हटले जात आहे.