इस्रायलच्या मोसाद मध्ये दोन महिलांना टॉप पोझिशन

जगभर आपल्या अत्यंत भयानक आणि पाताळयंत्री कारवायामुळे प्रसिद्ध असलेली इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसाद ने नुकतीच दोन महिलांची अत्यंत महत्वाच्या पदांवर नियुक्ती केली आहे. अर्थात त्यांची नावे जाहीर केली गेलेली नाहीत मात्र त्यांना कोड नेम दिली गेली आहेत. पैकी एकीचे कोडनेम ‘ए’ असून तिला इंटेलिजन्स विभागाची प्रमुख नेमले गेले आहे तर कोड नेम ‘के’ असलेल्या महिलेला इराण विभाग प्रमुख केले गेले आहे.

मोसाद मध्ये आता चार महिला मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. ‘ए’ गेली २० वर्षे मोसाद मध्येच काम करत आहे आणि इराण ऑटोमिक डील सह आंतरराष्ट्रीय दहशतवाद, अरब देशांची संबंध यांची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

मोसादचे वार्षिक बजेट ३ अब्ज डॉलर्सचे असून या संघटनेत ७ हजार कर्मचारी आहेत. इस्रायलचे संस्थापक आणि पहिले पंतप्रधान डेव्हीड बेन गुरियन यांनी १९४० मध्ये मोसादची स्थापना ज्यूंचे रक्षण आणि अरब हल्ल्यांना प्रत्युतर यासाठी केली होती.

इराणचा आण्विक कार्यक्रम हा इस्रायलसाठी सर्वात महत्वाचा असून इराणची अनेक आण्विक ठिकाणे बरबाद करण्यासाठी अनेक योजना इस्रायल सातत्याने आखते. नोव्हेंबर २०२० मध्ये इराणचे अणुशास्त्रज्ञ मोहसेन फकीजेद्दार यांची हत्या एआयच्या मदतीने रिमोट कंट्रोल मशीनगन च्या सहाय्याने केली गेली. त्या हत्येचा आरोप मोसादवर आहे.