शाहनवाज हुसेन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा, एफआयआर नोंदवण्याच्या आदेशाला स्थगिती


पाटणा – भारतीय जनता पक्षाचे नेते शाहनवाज हुसेन यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. बलात्काराच्या एका प्रकरणात शाहनवाज हुसैन यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याच्या आदेशावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हा दिलासा दिला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते शाहनवाज हुसेन यांच्याविरुद्ध बलात्काराचा आरोप करणाऱ्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवण्यासंबंधीच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

न्यायालयाने बजावली महिलेला नोटीस
याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पीडितेला नोटीसही बजावली आहे. यासोबतच सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत यावर उत्तर मागवण्यात आले आहे. शाहनवाज हुसैन यांच्यावर 2018 मध्ये एका महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. 2018 मधील कथित बलात्काराच्या या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सध्या शाहनवाज हुसैन यांच्यावरील सर्व कारवाईला स्थगिती दिली आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने दिले होते एफआयआर करण्याचे आदेश
दिल्ली उच्च न्यायालयाने अलीकडेच पोलिसांना शाहनवाज हुसैन यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला शाहनवाज हुसेन यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायमूर्ती यूयू ललित यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी करताना सांगितले की, प्रथमदर्शनी या प्रकरणाचा विचार करण्याची गरज आहे. या प्रकरणातील कार्यवाही थांबविण्याचे आदेश आम्ही जारी करत आहोत.

चार वर्ष जुने आहे प्रकरण
2018 मध्ये एका महिलेने शाहनवाज हुसेन यांच्यावर दिल्लीतील छतरपूर फार्म हाऊसवर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. याशिवाय जीवे मारण्याची धमकीही दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी कनिष्ठ न्यायालयात सांगितले होते की, शाहनवाज हुसैन यांच्याविरुद्ध कोणताही खटला चालवण्यात आलेला नाही. मात्र, त्यावेळीही न्यायालयाने पोलिसांचा युक्तिवाद फेटाळून लावत हा अदखलपात्र गुन्हा असल्याचे सांगितले होते.