एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवर आता 23 ऑगस्टला सुनावणी


मुंबई – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षादरम्यान उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यापूर्वी ही सुनावणी आज म्हणजेच 22 ऑगस्टला होणार होती, मात्र आता उद्या म्हणजेच 23 ऑगस्टला या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.

राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आज (22 ऑगस्ट) होणारी सुनावणी आता उद्या (23 ऑगस्ट) होणार आहे. आज तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाचे न्यायमूर्ती सीटी रविकुमार यांच्या अनुपस्थितीमुळे सुनावणी लांबणीवर पडली आहे.

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 4 ऑगस्ट रोजी शेवटची सुनावणी झाली. त्यानंतर तिसऱ्यांदा सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आणि त्यासंदर्भात दाखल विविध याचिका पुढील सुनावणीसाठी घटनापीठाकडे पाठवणार की नाही, याचा निर्णय न्यायालय घेणार आहे.

सोमवारी सरन्यायाधीश एन. व्ही रामण्णा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार होती. सरन्यायाधीश एन. व्ही रमना 26 ऑगस्टला निवृत्त होत असल्याने त्यापूर्वी निर्णय घेतला जाईल, अशी शिवसेनेला आशा आहे.