ऑस्टीन मार्टिनची नवी व्ही १२ वेन्टेज रोडस्टर सादर

ब्रिटनच्या लग्झरी स्पोर्ट्स कार कंपनी ऑस्टीन मार्टिनने त्यांची नवी व्ही १२ वेन्टेज रोडस्टर सादर केली असून ही लिमिटेड एडिशन आहे. कंपनी या मॉडेलच्या फक्त २४९ कार्स विकणार असून सादर होण्यापूर्वीच ही सर्व युनिट विकली गेली आहेत. या कारची पहिली डिलिव्हरी या वर्षाखेर केली जाणार असल्याचे जाहीर केले गेले आहे. मुळ ऑस्टीन मार्टिन व्ही १२ ची ही अॅडव्हान्स्ड एडिशन आहे.

या कारला ५.२ लिटरचे ट्वीन टर्बो १२ सिलिंडर इंजिन दिले गेले आहे. ० ते १०० किमीचा वेग ती ३.५ सेकंदात घेते आणि तिचा टॉप स्पीड आहे ताशी ३२० किमी. कारचे वजन कमी व्हावे म्हणून फ्रंट बम्पर, क्लॅमशेल बॉनेट, फ्रंट फेंडर, साईड सिल्स, कार्बन फायबर पासून बनविले गेले आहेत. कारला हलकी बॅटरी दिली गेली असून नव्या एग्झोस्ट सिस्टीम मुळे गाडीचे वजन ७.२ किलोने कमी झाले आहे. नव्या प्रकारच्या सीट्स मुळे सुद्धा वजन कमी होण्यास मदत झाली आहे.

ब्रेकिंग सिस्टीम मध्ये सहा पिस्टन कॅलीपर्स पुढे तर चार मागे आहेत आणि कार्बन सिरॅमिक ब्रेक्सक्सचा वापर केला गेला आहे. या कारची किंमत २.७० ते तीन कोटींच्या दरम्यान असेल असे सांगितले जात आहे.