भारतात सुशिक्षित भिकारी संख्या मोठी

भारत आणि भिकारी या बाबत नेहमीच वेगवेगळे सर्व्हे आणि संशोधने होत असतात. देशात एकही असे शहर नाही जेथे भिकारी नाहीत. भारतात भिक मागणे हा व्यवसायच बनला आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे भिकाऱ्यांमध्ये अनेक भिकारी सुशिक्षित आहेत. काही १०वी ,१२वी पास, काही पदवीधर, द्विपदवीधर तर काही डिप्लोमा होल्डर आहेत असे दिसून आले आहे. देशात बेरोजगारीचे प्रमाण मोठे आहेच भिकारी संख्या सुद्धा २०११ च्या जनगणनेनुसार चार लाखांपेक्षा अधिक आहे. त्यातील किमान २१ टक्के भिकारी साक्षर आहेत.

अनेकांना धडधाकट असूनही भिक व्यवसाय सोडण्याची इच्छा नाही. हा व्यवसाय न सोडण्याची कारणेही अजब आहेत. अनेकांना ९ ते ५ नोकरी पेक्षा काही तास भिक मागून कमाई जास्त होते याचा अनुभव आहे. शिवाय भारतात भिकारी आणि माफिया यांचेही साटेलोटे आहे.

मोठ्या शहरातून इंग्रजी बोलणारे, पदवी, द्वीपदवीधार, टेकसॅव्ही भिकारी वाढत आहेत. २०११ च्या शीरगणतीनुसार एकूण ४,१३,६७० भिकाऱ्यापैकी २.२१,६७३ पुरुष तर १,९१,९९७ महिला भिकारी आहेत. त्यातील २१ टक्के १२ वी पास आहेत. तीन हजार व्यावसायिक डिप्लोमा धारक आहेत. अधिक प्रगत राज्यात भिकारी अधिक आहेत आणि त्यात सुशिक्षित भिकारी संख्या जास्त आहेत. सर्वाधिक भिकारी प. बंगाल (८१२४४) मध्ये आहेत तर सर्वात कमी भिकारी लक्षद्वीप मध्ये फक्त दोन भिकारी आहेत. राज्यांपेक्षा केंद्रशासित प्रदेशात भिकारी कमी आहेत असेही दिसून आले आहे. केरळ मध्ये ४२ टक्के भिकारी शिक्षित आहेत.महाराष्ट्रात ७० हजार भिकारी असून त्यातील अनेकांना प्रशिक्षण देऊन रोजगार देण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकट्या मुंबईत २० हजार भिकारी आहेत.