पंतप्रधानांच्या सुरक्षेत तैनात होणार देशी मुधोळ श्वान

पंतप्रधानांच्या सुरक्षेत लवकरच देशी मुधोळ शिकारी श्वान तैनात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कर्नाटकातील ही मुळची जात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेत सुद्धा होती असे सांगितले जाते. पंतप्रधान मोदी यांनी ‘मन कि बात’ मध्ये या कुत्रांची तारीफ केल्यापासून ही जात चर्चेत आली आहे. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजे एसपीजी ने मुधोळ हाउंडची प्रशिक्षणासाठी भरती केली असून त्यानंतर हे श्वान डॉग स्क्वाड मध्ये रुजू करून घेतले जातील असे समजते.

एप्रिल मध्ये या जातीची दोन कुत्री एनएसजीने प्रशिक्षणासाठी निवडली होती. या कुत्र्यांची कामगिरी उत्तम दर्जाची ठरली आहे. अर्थात या जातीची कुत्री निवडण्याची ही पहिली वेळ नाही. सुरक्षा मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार या जातीच्या कुत्र्यांचा समावेश फेब्रुवारी २०१६ मध्ये प्रशिक्षण केंद्रात केला गेला होता. देशाच्या हवाई दलाने, निमलष्करी दलात, डीआरडीओ, राज्य पोलीस, वनविभाग यांनी या श्वानाच्या सेवा घेतलेल्या आहेत. आयटीबीपी, एसएसबी मध्ये तसेच बंदीपूर टायगर रिझर्व मध्ये स्पेशल टायगर रिझर्व फोर्स म्हणून ही कुत्री कार्यरत आहेत.

लांब पाय, चपळ सडपातळ शरीर, अतिशय तेज नजर, वास घेण्याची अधिक क्षमता अशी या कुत्र्यांची खासियत असून ही कुत्री २७० डिग्री मध्ये पाहू शकतात. ही कुत्री कमी थकतात आणि कमी आजारी पडतात. कोणत्याही हवामानात काम करू शकतात. अतिशय बहादूर आणि इमानदार असतात. देशाच्या सुरक्षेत आजपर्यंत लेब्रेडोर, जर्मन शेफर्ड, मुधोळ हाउंड, ग्रेट स्विस माउंटन, बेल्जियम मेलोनॉइस जातीची कुत्री समाविष्ट आहेत.