जवाहिरीचा खात्मा करणाऱ्या  ड्रोन्सची खरेदी करणार भारत

एमक्यू ९ बी जातीची ड्रोन भारत अमेरिकेकडून खरेदी करणार असून त्यासंदर्भातील बोलणी अंतिम टप्प्यात आल्याचे अधिकृत रक्षा मंत्रालयातील सूत्रांकडून सांगितले गेले आहे. एमक्यू ९ बी हा एमक्यू ९ रिपर ड्रोनचाच एक प्रकार असून यातूनच हेलफायर मिसाईल डागून काबुल मध्ये अल कायदाचा म्होरक्या अयमान अल जवाहिरी याला ठार केले गेले होते. चीन सीमेवर आणि हिंदी महासागरात गस्त आणि निगराणी मजबूत करण्यासाठी ३ अब्ज डॉलर्स पेक्षा अधिक किमतीची, ३० एमक्यू ९ बी प्रीडेटर सशस्त्र ड्रोन भारत खरेदी करत आहे. अमेरिकन कंपनी जनरल ऑटोमिक्स, दिल्ली आणि वॉशिंग्टन दरम्यान सरकारी पातळीवर खरेदी चर्चा अंतिम टप्प्यात आहे.

ही ड्रोन सेनेच्या तिन्ही दलांसाठी खरेदी केली जाणार आहेत. समुद्र सतर्कता, पाणबुडी रोधी शस्त्रे, आकाशात लक्ष्य साधणे आणि जमिनीवरील लक्ष्याला निशाणा बनविणे अशी विविध कामे हे ड्रोन करू शकते. हवेत सलग ३५ तास उडण्याची त्याची क्षमता आहे. चार हेलफायर मिसाईल आणि ४५० किलो बॉम्ब ते वाहून नेऊ शकते. ही ड्रोन दोन प्रकारची आहेत. आकाश गार्डियन आणि समुद्री गस्त अशी दोन्ही कामे त्यामुळे होऊ शकतात.

भारतीय नौसेनाने २०२० मध्ये हिंद महासागरात निगराणी करण्यासाठी दोन एमक्यू ९ बी ड्रोन एक वर्षाच्या करारावर भाड्याने घेतली होती. त्यांचा भाडे करार आणखी एक वर्षाने वाढविला गेला आहे. चीनची हिंद महासागरात वर्दळ वाढली असून त्यावर नजर ठेवण्यासाठी ही ड्रोन वापरली जात आहेत. गेल्या सहा महिन्यात या ड्रोननी ३ हजार तास उड्डाण करून १.४० कोटी मैलाचा परिसर पिंजून काढला आहे. सेनेच्या तिन्ही विभागांना प्रत्येकी १०-१० ड्रोन दिली जाणार आहेत असे समजते.