मुंबई: महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शनिवारी शिर्डी येथून पंजाब पोलिस अधिकाऱ्याच्या वाहनात आयईडी लावल्याप्रकरणी एका संशयिताला अटक केली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, अटक करण्यात आलेल्या आरोपीला पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई, पंजाब पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीत आयईडी ठेवल्याप्रकरणी शिर्डीतून एकाला अटक
शिर्डी येथून संशयित आरोपीला अटक
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पंजाब पोलिसांसोबत शनिवारी पहाटे एटीएसने केलेल्या संयुक्त कारवाईत अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी शहरात शोध मोहीम राबवून राजेंद्र नावाच्या एका आरोपीला ताब्यात घेतले.
या आठवड्याच्या सुरुवातीला, पंजाब पोलिसांनी अमृतसरच्या रणजीत एव्हेन्यू परिसरात उपनिरीक्षक दिलबाग सिंह यांच्या वाहनाखाली पेरलेल्या आयईडी प्रकरणी दिल्लीतून दोन जणांना अटक केली. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर संशयितांना पकडण्यासाठी पंजाब पोलिसांनी वेगवेगळ्या राज्यात पथके पाठवली होती.
या प्रकरणात पकडलेल्या हरपाल सिंग आणि फतेह दीप सिंग यांना न्यायालयाने यापूर्वीच आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सोमवारी रात्री सिंग यांच्या कारमध्ये आयईडी टाकून दोघेही फरार झाल्याचा आरोप आहे. बुधवारी दोघेही कॅनडाला पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. मात्र पोलिसांच्या स्पेशल सेलने त्यांना दिल्ली विमानतळावरून अटक केली.