Gujarat News: विधानसभा निवडणुकीपूर्वी गुजरात मंत्रिमंडळात मोठा फेरबदल, मंत्र्यांकडून काढून घेतली खाती


गांधीनगर – गुजरातमध्ये वर्षाखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय खळबळ उडाली आहे. याच अनुषंगाने मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने आपल्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी राजेंद्र त्रिवेदी यांच्याकडून महसूल मंत्रालयाचा कार्यभार परत घेतला आहे, तर पूर्णेश मोदींकडून रस्ते आणि इमारत मंत्रालयाचा कार्यभार काढून घेतला आहे.

या बदलासंबंधीची अधिसूचनाही राज्य सरकारने जारी केली आहे. त्यानुसार गृह राज्यमंत्री हर्ष रमेश कुमार संघवी यांच्याकडे महसूल मंत्रालयाचा, तर जगदीश ईश्वर पांचाळ यांच्याकडे रस्ते व इमारत मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

महसूल मंत्रालय काढून घेतल्यानंतर राजेंद्र त्रिवेदी पूर्वीप्रमाणेच कायदा आणि न्याय, आपत्ती व्यवस्थापन, विधिमंडळ आणि संसदीय कामकाज या मंत्रालयांची जबाबदारी सांभाळणार आहेत. दुसरीकडे, पूर्णेश मोदी परिवहन, नागरी विमान वाहतूक, पर्यटन आणि तीर्थक्षेत्र विकास मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारणार आहेत.