Lal Singh Chaddha Box Office : देशात फ्लॉप ठरलेल्या लाल सिंह चड्ढाचे जगभरातील कलेक्शन जाणून वाटेल आश्चर्य


2018 मध्ये आलेल्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटानंतर बॉलिवूड अभिनेता आमिर खान ‘लाल सिंग चड्ढा’द्वारे तब्बल चार वर्षांनी पडद्यावर परतला. रिलीजपूर्वीच बहिष्काराला सामोरे जावे लागले आणि हा ट्रेंड चित्रपट रिलीज झाल्यानंतरही कायम राहिला. परिणामी हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर काही विशेष प्रभाव दाखवू शकला नसला, तरी जागतिक स्तरावर या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

भारतीय बॉक्स ऑफिस कलेक्शन
‘लाल सिंह चड्ढा’ 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जवळपास 11.5 कोटींची कमाई केली होती, मात्र कालांतराने चित्रपटाच्या कमाईचा हा आकडा कमी होत गेला. बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, दुसऱ्या शुक्रवारी ते केवळ 1.25 कोटी कमवू शकले. एकूणच, 9 दिवसांत ‘लाल सिंग चड्ढा’ने भारतीय बॉक्सवर केवळ 60.69 कोटींचा गल्ला जमवला आहे, ज्यामुळे तो फ्लॉपच्या श्रेणीत उभा राहिला आहे.

परदेशात करत आहे चांगले प्रदर्शन
‘लाल सिंह चड्ढा’ भारतात वाईटरित्या फ्लॉप झाला, तर दुसरीकडे बॉलीवूड हंगामाच्या अहवालानुसार, तो परदेशात चांगली कामगिरी करत आहे आणि त्याने आतापर्यंत 47.78 कोटींचे कलेक्शन केले आहे. याच कारणामुळे चित्रपटाचे जगभरातील कलेक्शन चांगले झाले असून आमिर खानचा चित्रपट 100 कोटींचा आकडा पार करण्यात यशस्वी ठरला आहे. ‘लाल सिंह चड्ढा’चे देशी-विदेशी कमाईसह जगभरातील बॉक्स ऑफिस कलेक्शन 108.47 कोटी झाले आहे.

मात्र, 25 ऑगस्टला विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांचा ‘लाइगर’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. त्याचवेळी, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ‘लाल सिंह चड्ढा’च्या कमाईत आणखी घट होण्याची शक्यता आहे.