माजी पंतप्रधान इम्रान खानला होऊ शकते अटक, बेकायदेशीर फंडिंग प्रकरणात FIA करू शकते कारवाई


इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना कधीही अटक होऊ शकते. फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एफआयए) वारंवार समन्स पाठवल्यानंतर त्यांना अटक होऊ शकते. खरं तर, बेकायदेशीर फंडिंग प्रकरणात एफआयएने बुधवारी इम्रान खानला चौकशीसाठी समन्स बजावले होते, मात्र इम्रानने हजर राहण्यास नकार दिला. यानंतर शुक्रवारी त्यांना दुसरे समन्स पाठवण्यात आले. असे असतानाही इम्रान खान तपास यंत्रणेसमोर हजर झाले नाहीत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वारंवार समन्स बजावूनही हजर न झाल्यामुळे पाकिस्तानची सर्वात मोठी तपास यंत्रणा त्यांना अटक करू शकते. तथापि, एजन्सीच्या काही सूत्रांचे म्हणणे आहे की इम्रान खान यांच्या अटकेचा अंतिम निर्णय तीन नोटिसांनंतर घेतला जाईल.

समोर आल्या इम्रानशी संबंधित पाच कंपन्या
पाकिस्तानी मीडियानुसार, एफआयएला इम्रान खानशी संबंधित पाच कंपन्यांची माहिती मिळाली आहे. या कंपन्या यूएसए, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, यूके आणि बेल्जियम येथे आहेत. तर इम्रान खान यांनी पाकिस्तान निवडणूक आयोगाला (ECP) सादर केलेल्या अहवालात या कंपन्यांचा उल्लेख नाही.

इम्रान खान यांनी दिला आहे कायदेशीर कारवाईचा इशारा
बुधवारी एफआयएने इम्रान खान यांना पहिली नोटीस पाठवली होती. यानंतर इम्रान खान यांनी फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला पत्र लिहून दोन दिवसांत नोटीस मागे घेण्याचा इशारा दिला आहे. तुम्हाला उत्तर देण्यास मी जबाबदार नाही, असे खान यांनी म्हटले आहे. दोन दिवसांत नोटीस मागे न घेतल्यास मी तुमच्यावर कायदेशीर कारवाई करेन, असे त्यांनी म्हटले आहे.

FIA कडे आहेत पुरावे
एफआयएकडे इम्रान खानविरोधात पुरेसे पुरावे असल्याचे अहवालात म्हटले आहे. तिसरी आणि अंतिम नोटीस पुढील आठवड्यात एजन्सी जारी करू शकते.