यूजी आणि पीजी विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा, बेस्ट बसमध्ये मिळणार सवलत, जाणून घ्या काय आहे योजना


मुंबई : मुंबईतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता बेस्ट बसमधून प्रवास करण्यासाठी त्यांना पूर्वीपेक्षा कमी भाडे मोजावे लागणार आहे. ही सुविधा मुंबईतील पदवीपूर्व आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी असून, त्याअंतर्गत त्यांना या बसमधून पूर्वीपेक्षा खूपच कमी भाड्यात प्रवास करण्याची सुविधा मिळणार आहे. 22 ऑगस्ट 2022 पासून या योजनेचा लाभ घेता येईल. त्यानंतर पास बनवून विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात बेस्ट बसमधून प्रवास करता येणार आहे.

विद्यार्थ्यांना किती सवलत मिळेल –
TOI च्या अहवालानुसार, बेस्ट बसेसच्या 100 ट्रिपच्या सुविधेसाठी, ज्यासाठी पूर्वी उमेदवारांना 999 रुपये मोजावे लागत होते, आता त्यांना फक्त 500 रुपये भरावे लागतील. प्रवासखर्च जवळपास 50 टक्क्यांनी कमी झाला आहे. त्याचप्रमाणे तीन महिन्यांच्या पासची किंमत 1500 रुपये आणि 6 महिन्यांच्या पासची किंमत 2500 रुपये ठेवण्यात आली आहे.

महाव्यवस्थापकांचे काय म्हणणे आहे –
या संदर्भात बेस्ट बसेसचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र सांगतात की, 22 ऑगस्टपासून हे पास दिले जातील. यासाठी विद्यार्थी बेस्ट चलो अॅपवरून ऑनलाइन अर्ज करू शकतात किंवा तुम्ही जवळच्या डेपोमधून स्मार्ट कार्ड घेऊ शकता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात यूजी आणि पीजी विद्यार्थ्यांना बस पास मिळतील, अशी घोषणा केली होती. त्याचवेळी बेस्ट बसेसनेही ही सुविधा सुरू केली.

शालेय विद्यार्थ्यांनाही मिळणार सूट –
बेस्टने दिलेल्या निवेदनानुसार पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दरमहा 200 रुपये, तीन महिन्यांचा पास 600 रुपये आणि 6 महिन्यांचा पास 1000 रुपयांमध्ये दिला जाईल. त्याचबरोबर सहावी ते दहावीच्या मुलांची रक्कमही तेवढीच राहील, त्यात फक्त 50 रुपये जोडले जातील. म्हणजेच त्यांची किंमत अनुक्रमे 250, 650 आणि 1250 इतकी असेल.