मानहानीच्या प्रकरणात अरविंद केजरीवाल-मनीष सिसोदिया आणि योगेंद्र यादव यांची निर्दोष मुक्तता


नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि योगेंद्र यादव यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अधिवक्ता सुरेंद्र शर्मा यांनी दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यातून राऊस एव्हेन्यू कोर्टाने अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि योगेंद्र यादव (माजी आप नेते) यांची निर्दोष मुक्तता केली आहे. हे प्रकरण 2013 च्या विधानसभा निवडणुकीशी संबंधित आहे. ज्यामध्ये आम आदमी पक्षाकडून विधानसभा निवडणुकीत शेवटच्या क्षणी त्यांची उमेदवारी रद्द केल्याचा दावा करण्यात आला होता.

खोटे आरोप करून त्यांचे तिकीट कापल्याची चर्चा
सुरेंद्र कुमार शर्मा यांनी 2013 मध्ये आम आदमी पार्टीने त्यांच्याशी संपर्क साधल्याचा आरोप केला होता. यादरम्यान त्यांना पक्षाच्या तिकीटावर दिल्ली विधानसभा निवडणुकीत सहभागी होण्यास सांगण्यात आले, मात्र त्यानंतर त्यांच्यावर खोटे आरोप करून त्यांचे तिकीट कापण्यात आले.

बार असोसिएशन आणि त्यांच्या सन्मानाचे झाले नुकसान
मानहानीच्या तक्रारीत शर्मा म्हणाले होते की, केजरीवाल यांनी 14 ऑक्टोबर 2013 रोजी आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तात त्यांच्याविरुद्ध अपमानास्पद शब्द वापरले होते. त्यांच्या या कृत्यामुळे बार असोसिएशन आणि समाजात त्यांची प्रतिष्ठा खराब झाली होती.

तिकीट कापून दुसऱ्याला दिले
2013 च्या विधानसभा निवडणुकीत शाहदरा भागातून सुरेंद्र शर्मा यांना आम आदमी पक्षाकडून तिकीट देण्यात आले होते, पण नंतर त्यांचे तिकीट कापून दुसऱ्याला देण्यात आले. शर्मा यांची गुन्हेगारी प्रतिमा असल्याचे कारण देत आपने त्यांचे तिकीट कापले होते. यानंतर शर्मा यांनी या नेत्यांवर मानहानीचा खटला दाखल केला होता.