मुंबई : मुंबईत शुक्रवारी कृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी साजरी करताना 78 ‘गोविंदा’ जखमी झाले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. बऱ्याच जखमींना उपचारानंतर सोडण्यात आले, तर 11 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे बीएमसीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
मुंबईत दहीहंडी उत्सवादरम्यान 78 ‘गोविंदा’ जखमी, तर 11 रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र सरकारने ‘गोविंदा मंडळी’च्या जखमी सदस्यांवर मोफत उपचार करण्याच्या सूचना सरकारी रुग्णालयांना दिल्या आहेत. सायंकाळी 6 वाजेपर्यंत जखमींपैकी 17 जणांवर केईएम रुग्णालयात, 11 जणांवर जीटी रुग्णालयात, 10 जणांवर राजावाडी रुग्णालयात आणि नऊ जणांवर नायर रुग्णालयात उपचार करण्यात आले.
दहीहंडी म्हणजे काय?
या उत्सवादरम्यान, दही भरलेले मटके उंच टांगले जाते आणि गोविंदा मानवी पिरॅमिड बनवून, ते फोडतात. जन्माष्टमीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात या खेळाचे आयोजन केले जाते. खेळादरम्यान स्पर्धक पडण्याच्या आणि जखमी होण्याच्या घटना सामान्य आहेत.
मुंबई आणि ठाणे सारख्या शहरांमध्ये दहीहंडीचे कार्यक्रम आणि गोविंदा मंडळींना मोठा राजकीय आश्रय मिळतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत घोषणा केली की त्यांच्या सरकारने दहीहंडी या लोकप्रिय सणाला साहसी खेळाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.