आता घरबसल्या मिळणार प्रिंट आउट सेवा 

फूड डिलिव्हरी झोमॅटोचे स्वामित्व असलेल्या क्विक कॉमर्स ब्लींकिट तर्फे आता ग्राहकांना घरबसल्या प्रिंट आउट काढून देण्याची सेवा सुरु केली गेली आहे. त्यामुळे घरबसल्या आवश्यक कागदपत्रांच्या ब्लॅक व्हाईट किंवा कलर प्रिंट्स मिळू शकणार आहेत. काळ्या पांढऱ्या एका प्रिंट साठी ९ रूपये, कलर प्रिंट साठी १९ रुपये आणि प्रत्येक ऑर्डरचा डिलिव्हरी चार्ज म्हणून २५ रुपये त्यासाठी आकारले जाणार आहेत. याची सुरवात गुरूग्रामपासून झाली असून लवकरच दिल्ली आणि अन्य शहरात ही सेवा सुरु केली जात आहे. सध्या विद्यार्थी वर्गाला नजरेसमोर ठेऊन ही सेवा सुरु केली गेल्याचे सांगितले जात आहे.

अनेकदा विविध प्रकारची प्रमाणपत्रे, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, वीजबिले, फोन बिले यांच्या फोटो कॉपीज विविध ठिकाणी कामासाठी द्याव्या लागतात. भाडे करार करताना सुद्धा अशी कागदपत्रे लागतात. अगदी आणीबाणीच्या वेळी अश्या फोटो कॉपीज काढण्यासाठी बाहेर जाऊन शोध घेण्यापेक्षा घरबसल्या ही सेवा मिळाली तर नक्कीच फायद्याची ठरू शकते हे लक्षांत घेऊनच ही नवी सेवा सुरु केली गेली आहे.

ब्लींकिटचे प्रवक्ते या विषयी बोलताना म्हणाले, आम्ही नेहमीच ग्राहकांना नवीन सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे.  झोमॅटोने नुकतेच ४४४७ कोटी रुपये गुंतवून ब्लींकिटचे अधिग्रहण केले आहे. त्याचे सुरवातीचे नाव ग्रोफर्स होते. आता नाव बदलले गेले आहे. गतवर्षी कंपनीने स्वतःची ग्रोसरी डिलिव्हरी कंपनी सुरु केली असून ग्राहपयोगी सामानची डिलिव्हरी त्या मार्फत केली जाते. भारताच्या सर्व महत्वाच्या शहरात यासाठी ऑन डिमांड डिलिव्हरी सेवा सुरु असून मागणी आल्यापासून १० मिनिटात आवश्यक सामान घरपोच दिले जाते असा कंपनीचा दावा आहे.