अश्या अलिशान, महागड्या घरांचे मालक आहेत हे क्रिकेटपटू

फुटबॉल नंतर क्रिकेट हा जगात सर्वाधिक पसंती मिळणारा खेळ आहे. भारताची ओळख तर क्रिकेटवेडा देश अशीच आहे. भारतीयांना क्रिकेटचे नुसते वेड नाही तर त्यांच्या आवडत्या खेळाडूंसंदर्भातील एकूण एक माहिती आपल्याला मिळाली पाहिजे अशीही त्यांची अपेक्षा असते. त्यामुळे या खेळाडूंची राहणी, त्यांची श्रीमंती, कुटुंब, कार्स, घरे, त्यांचे छंद यांच्या बातम्या मोठ्या चवीने वाचल्या जातात.

या खेळाडूंच्या निवासस्थानांचा विचार केला तर महागड्या घरांच्या यादीत कोण कोण खेळाडू येतात हे जाणून घेणे मनोरंजक आहे. महागड्या घरांच्या बाबतीत पहिल्या पाच क्रमांकांत येतात महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, युवराज सिंग, सचिन तेंडूलकर आणि रोहित शर्मा.

माहीच्या रांची येथील फार्म हाउसची किंमत १०० कोटी असून ते सात एकर परिसरात आहे. येथे सर्व खेळासाठी सुविधा आहेत. शिवाय एक स्विमिंग पूल आणि प्रचंड मोठे कार पार्किंग सुद्धा आहे. टीम इंडियाचे ‘रन मशीन’ अशी ओळख असलेल्या विराट कोहलीचे नवे घर मुंबई मध्ये ओंकार टॉवर्स मध्ये असून ३५ कोटी रुपये किमतीचे आहे. मुंबईत येण्यापूर्वी तो गुरूग्राम मध्ये राहत होता तेथील त्यांच्या बंगल्याची किंमत ८० कोटी असल्याचे सांगितले जाते.

अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग त्याच्या लग्झरी लाईफ साठी फेमस आहे. २०१३ मध्ये त्याने मुंबईच्या ओंकार टॉवर्स मध्येच २९ व्या मजल्यावर १६ हजार चौरस फुटांचे अलिशान घर खरेदी केले आहे. त्याची किंमत ६४ कोटी असल्याचे समजते. क्रिकेटचा भगवान सचिन तेंडूलकर याच्या बांद्रा येथील अलिशान बंगल्याची किंमत ३८ कोटी असल्याचे सांगतात तर रोहित शर्मा याने मुंबई मध्येच अहुजा टॉवर इमारतीत २९ व्या मजल्यावर ६ हजार चौरस फुटाचे घर घेतले असून त्याची किंमत ३० कोटी सांगितली जाते.