मुंबईवर पुन्हा २६/११ सारखा हल्ला? कंट्रोल रूमकडे धमकीचा फोन
मायानगरी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर पुन्हा २६/११ सारखा दहशतवादी हल्ला केला जाईल असा धमकीचा फोन मुंबई पोलीस कंट्रोल रूमकडे आला आहे. पोलिसांनी प्रथम हा कॉल चेष्टा की खरी धमकी या दृष्टीने मागोवा घेतला तेव्हा हा कॉल पाकिस्तानी नंबरवरून आल्याचे दिसून आले असे समजते. असे धमकीचे फोन येणे ही पोलिसांसाठी नित्याची घटना असली तरी असे फोन आल्यास त्याचा गंभीरपणे छडा लावला जातो असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
गुरुवारी रायगड मध्ये अरबी समुद्रात एक संशयास्पद नाव सापडली होती. तिच्यात तीन एके ४७ व काही स्फोटके होती. दुसर्या नावेत काही कागदपत्रे होती. तेव्हाच मुंबई मध्ये हाय अॅलर्ट जारी केला गेला होता. नंतर तपासात ही बोट ऑस्ट्रेलियन नागरिकाची असल्याचे आणि अपघातात तिचे दोन तुकडे झाल्याचे समोर आले होते. खोल समुद्रातून भरतीच्या वेळी ही बोट रायगड मध्ये आली असावी असा अंदाज आहे. पण मुंबई वर २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कसाब आणि त्याचे १० साथीदार बोटीतूनच आले होते हे लक्षात घेऊन कंट्रोल रूम कडे आलेल्या कॉलची पडताळणी केली जात आहे.
ही धमकी व्हॉटस अप नंबरवरून दिली गेली असून हा नंबर पाकिस्तानचा आहे. धमकी देताना, तुम्ही लोकेशन ट्रेस केले तर मुंबई बाहेरचे दिसेल, तर धमाका मात्र मुंबईत होईल आणि त्यासाठी सहा लोक काम करत आहेत’ असे पोलिसांना सांगितले गेल्याचे समजते.