असा आहे बासरीचा इतिहास

देशात जन्माष्टमी आणि दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला आणि त्यानिमित्ताने देश कृष्णमय झाल्याचे दिसले. श्रीकृष्ण आणि बासरी यांचे असे अतूट नाते आहे कि बासरी शिवाय कृष्ण ही कल्पना आपण करू शकत नाही. असे म्हणतात, बासरी हे असे वाद्य आहे जे माणसाने प्रथम वाजविले असावे. सहज पकडली आणि फुंक मारली आणि त्यातून निघालेल्या सुरांनी माणसाचा आनंदाला पारावर राहिला नाही. आज बासरीचे स्वरूप खूप बदलले आहे. बासरीचा इतिहास फार प्राचीन म्हणजे अगदी ४३ हजार वर्षे जुना असावा असे अनेक पुरावे उपलब्ध आहेत.

बासरी बनविण्याची प्रक्रिया तुलनेने सोपी. नैसर्गिक बांबू निवडून त्याच्या आतील गाठी काढून त्यावर सात छेद दिले जातात. त्यातील पहिला तोंडाने फुंक मारण्यासाठी असतो. बाकीच्या छिद्रातून विविध स्वर निघतात. विशेष म्हणजे जगातील बहुतेक सर्व देशाच्या संस्कृती मध्ये बासरी आहेच, भले तिची नावे वेगवेगळी आहेत. इतिहासात जर्मनी मध्ये ३५ ते ४० हजार वर्षापूर्वीचे असे वाद्य स्वबियान आल्ब क्षेत्रात मिळाले आहे. भारतात कृष्ण काळापासून बासरी विशेष प्रसिद्धीत आली. स्लोवेनिया मध्ये ४३ हजार वर्षे जुने असे वाद्य मिळाले असून चीन मध्ये ९५०० वर्षे जुनी बासरी मिळाली आहे. सारस पक्षाच्या पिसातील हाडापासून ती बनविली गेली होती. बायबल सह सर्व धर्मग्रंथात बासरी सदृश वाद्यांचे उल्लेख आहेत.

पोलिसांची शिट्टी ही सुद्धा एक प्रकारची छोटी बासरीच. फ्ल्यूट हे त्याचेच एक रूप. भारतीय शास्त्रीय संगीतात पन्नालाल घोष यांनी ७ भोके असलेली ३२ इंची बासरी बनविली. हरिप्रसाद चौरासिया हीच बासरी वापरतात. भारतात बासरी साठीचा सर्वात उत्तम प्रकारचा बांबू दक्षिण भारतातील नागरकॉईल येथे मिळतो असे सांगतात.