नवाब मलिक यांच्या विरोधात तक्रार केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी समीर वानखेडे यांना मिळाली धमकी, तपासात गुंतले पोलीस


मुंबई : मुंबई एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना सोशल मीडियावर धमक्या आल्या आहेत. खरे तर त्यांनी त्याच दिवशी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना ही धमकी मिळाली.

मुंबई पोलिसांनी सांगितले की, समीर वानखेडे यांच्या तक्रारीनंतर गोरेगाव पोलिसांनी नवाब मलिक यांच्याविरुद्ध कलम 500, 501 आणि एससी/एसटी कायद्यानुसार आदल्या दिवशी गुन्हा दाखल केला होता. त्याचवेळी समीर वानखेडे यांनी आता गोरेगाव पोलीस ठाण्यात धमकी दिल्याची माहिती दिली आहे. यासोबतच त्यांनी मिळालेला मेसेजही पोलिसांना शेअर केला आहे, त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

यापूर्वीही मलिक यांनी केला होता धमक्या मिळाल्याचा आरोप
खरं तर, गेल्या वर्षी बॉलिवूडमध्ये कथित ड्रग्ज प्रकरण समोर आल्यापासून समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यात तणाव होता. गेल्या वर्षीही दोघांमधील धमक्यांमुळे हे प्रकरण चर्चेत आले होते. त्यानंतर नवाब मलिक यांनी दावा केला की एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना टार्गेट करू नका, अशा धमक्या मिळत होत्या, त्यानंतर नवाब मलिक यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती.

समीर वानखेडे यांनी यापूर्वीही महाराष्ट्र पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात असल्याचा आरोप केला होता. सिव्हिल कपडे घातलेले अनेक जण आपला पाठलाग करत असल्याचे समीर वानखेडे यांनी तक्रारीत म्हटले होते.