Coronavirus In Mumbai: मुंबईत कोरोनाचे 1,201 नवीन रुग्ण, जूननंतर सर्वाधिक बाधितांची नोंद


मुंबई : महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या संसर्गाने थैमान घातले आहे. गुरुवारी मुंबईत कोरोना विषाणू संसर्गाचे 1,201 नवीन रुग्ण आढळले आहेत. 30 जूननंतर एका दिवसात नोंद झालेल्या नवीन प्रकरणांची ही सर्वाधिक संख्या आहे. याच काळात कोविड-19 महामारीमुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यापूर्वी, 30 जून रोजी मुंबईत संसर्गाची 1,265 प्रकरणे नोंदवली गेली होती आणि एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाली होती.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) सांगितले की बुधवारी शहरात संसर्गाची 975 प्रकरणे नोंदवली गेली, तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला. महानगरपालिकेने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, नवीन प्रकरणांसह, मुंबईत आतापर्यंत संसर्गाची 11,35,680 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर या प्राणघातक विषाणूमुळे 19,670 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

24 तासांत तपासण्यात आले 11,253 नमुने
मुंबईत गेल्या 24 तासांत 11,253 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यासह, आतापर्यंत 1,79,80,370 नमुने तपासण्यात आले आहेत. या कालावधीत शहरातील 681 रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत. त्यानुसार मुंबईत सध्या 5 हजार 712 रुग्ण उपचार घेत आहेत.