रिलायंस रिटेलला डी मार्टची टक्कर- सुरु होणार १२०० नवी स्टोर्स

डी मार्टचे राधाकिशन दमाणी रिलायंस रिटेलच्या मुकेश अंबानी यांच्याबरोबर स्पर्धेसाठी तयार झाले असून डी मार्ट देशभरात लवकरच १२०० नवी स्टोर्स सुरु करणार आहे. सध्याच्या डी मार्ट स्टोर्सच्या तुलनेत ही संख्या पाचपट अधिक आहे. त्यासाठी आखल्या गेलेल्या योजनेवर काम सुरु झाले आहे. डी मार्टची देशात सध्या २८४ स्टोर्स आहेत . ही संख्या आता १५०० वर नेली जात आहे.

अॅव्हेन्यू सुपरमार्ट लिमिटेडचे सीईओ नेविल नोरोन्हा या संदर्भात माहिती देताना म्हणाले, मार्च २०२४ पर्यंत १३५ नवी डी मार्ट स्टोर्स सुरु होत आहेत. रिलायंस रिटेलची देशात १२७११ स्टोर्स आहेत. पण रिटेल क्षेत्रात व्यवसाय संधी खूप आहेत आणि या क्षेत्राचा विकास वेगाने होत आहे. डी मार्टने मार्च ते ऑगस्ट काळात नवी ५० स्टोर्स सुरु केली आहेत. डी मार्ट ला ग्राहकांचा प्रतिसाद चांगला आहे. रोजच्या वापरातील सामान, किराणा खरेदीसाठी लोकांची पहिली पसंती डी मार्टच आहे असेही ते म्हणाले.

राधाकिशन दमाणी यांनी पहिले डी मार्ट मुंबई पवई येथे २००२ मध्न्ये सुरु केले होते. साधी राहणी, गोड बोलणे आणि शांत स्वभाव ही त्यांची वैशिष्टे सांगितली जातात. प्रत्येक कुंभमेळ्यात ते स्नान करण्यासाठी जातात, सकाळचा वेळ निर्णय घेण्यात वाया जाऊ नये म्हणून फक्त पांढरेच कपडे वापरतात. शुध्द शाकाहारी असलेल्या दमाणी यांची ओळख ‘रिटेल किंग’ अशी आहे. ८० च्या दशकात ५ हजार रुपयांवर व्यवसाय सुरु केलेल्या दमाणी यांची आजची संपत्ती १.६ लाख कोटी असून फोबर्स श्रीमंत यादीत ते ८१ नंबरवर आहेत.

२०१७ मध्ये डी मार्ट शेअर बाजारात लिस्ट झाली तेव्हापासून या शेअर मध्ये १३७० टक्के वाढ झाल्याचे सांगितले जाते.