उडणाऱ्या ड्रोन कॅमेऱ्यासह येतोय विवोचा नवा स्मार्टफोन

चीनी कंपनी विवो लवकरच नवल वाटेल असा स्मार्टफोन सादर करण्याच्या तयारीत आहे. हा फोन ड्रोन कॅमेरा असलेला असेल. म्हणजे या फोन मधील कॅमेरा ड्रोन प्रमाणे बाहेर उडेल आणि हवेतच फोटो, व्हिडीओ शूट करेल. स्मार्टफोन सेक्टरमध्ये दरवर्षी नवे तंत्रज्ञान येत आहेच आणि अनेक स्मार्टफोन कंपन्यांनी २०२२ मध्ये अनेक स्मार्टफोन नव्या तंत्रज्ञानासह सादर केले आहेत. त्यात २०० एमपी कॅमेरा असलेल्या फोन्सचा समावेश आहे. स्मार्टफोनच्या फीचर्स मध्ये ग्राहक कॅमेऱ्याबाबत नेहमीच जागरुकता दाखवतात असे दिसून आले आहे.

विवोच्या नव्या ड्रोन कॅमेरा असलेल्या फोनच्या तंत्रज्ञानाचे पेटंट २०२० मध्येच घेतले गेले होते. फोन पासून कॅमेरा वेगळा होऊन हवेत ड्रोनप्रमाणे उडेल आणि फोटो काढेल असे हे तंत्रज्ञान आहे. या फोनसाठी २०० एमपीचा कॅमेरा, ३२ एमपीचे अल्ट्रा वाईड लेन्स, १६ एमपीचा वाईड सेन्सर आणि ५ एमपीचा डेप्थ सेन्सर दिला जाईल तसेच सेल्फी साठी ६४ एमपी कॅमेरा दिला जाईल. १२ जीबी रॅम आणि २५६ व ५१२ जीबी मेमरी अशी दोन ऑप्शन दिली जातील.

या फोन साठी ६९०० एमएएच बॅटरी ६५ वॉट चार्जिंग सपोर्ट सह असेल आणि फुल चार्ज मध्ये हा फोन ३६ तास चालेल. ड्रोन कॅमेरा अन्य कुठे आपटू नये म्हणून त्याला दोन इन्फ्रारेड सेन्सर दिले गेले आहेत. तसेच ड्रोन कॅमेरा फोन मधून बाहेर आल्यावर सहज उडावा म्हणून त्याला चार प्रोपेलर आहेत. फोन बॅटरी शिवाय आणखी एक बॅटरी त्यासाठी दिली गेली आहे. हा फोन २०२२ किंवा २०२३ च्या सुरवातीला बाजारात दाखल होईल असे सांगितले जात आहे.