गेमिंग कंपनी टेन्सेटने ५५०० कर्मचाऱ्यांना दिला नारळ

चीनी समूह टेन्सेटने ५५०० कर्मचाऱ्याना कामावरून कमी केले आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या बातमीनुसार चीन मधील ही सर्वात मोठी व्हिडीओ गेमिंग व सोशल मिडिया कंपनी असून दुसऱ्या तिमाही मध्ये या कंपनीचा महसूल एकदम कमी झाला आहे. जून तिमाहीत या कंपनीचा महसूल १९.८ अब्ज डॉलर्स होता. गतवर्षीच्या तुलनेत त्यात ५७ टक्के घट झाली आहे. कंपनीच्या स्थापनेपासून म्हणजे २०१४ पासून प्रथमच कर्मचारी कपात केली गेली आहे.

कंपनीचे सीईओ व संस्थापक पोनी मा हुआतेंग म्हणाले या वर्षी निव्वळ नफा ५७ टक्के कमी झाला आहे. महसूल कमी झाला असला तरी कंपनीची कामगिरी चांगली राहावी म्हणून कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. आर्थिक मंदी मुळे व्हिडीओ गेमिंगचा सेल स्थानिक तसेच जागतिक पातळीवर घसरला आहे. कंपनीने काही बडे गेम्स आणले पण त्यांना ग्राहकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. कोविड लॉकडाऊन मुळे आर्थिक मंदी आली आहे आणि युजर्सची क्रय शक्ती कमी झाली आहे याचा अनुभव आम्ही घेत आहोत.

हीच कंपनी चीनच्या लोकप्रिय व्ही चॅट मेसेजिंग प्लॅटफॉर्मची निर्माती आहे. २००४ पासून म्हणजे स्थापनेपासून या कंपनीने नेहमीच दोन अंकी व्यवसाय वाढ पाहिली आहे. पण बीजिंगने बड्या टेक कंपन्यावर २०२० मध्ये घातलेल्या बंधनांमुळे कंपन्याच्या विकासाला खीळ बसली आहे. मिळालेल्या माहितीनुसार टेन्सेट खाद्यवितरणातील बडी कंपनी मिटूआन मधील त्यांचा १७ टक्के शेअर विकण्याच्या विचारात आहे.