घरात थिएटर, परदेशी बाथ टब, पाच घरे, फार्म हाऊस, 16 लाखांची रोकड… मध्यप्रदेशातील आरटीओ अधिकाऱ्याची मालमत्ता वाचून व्हाल थक्क


होम थिएटर, अगदी पंचतारांकित हॉटेलमधील लक्झरी बाथ टब आणि तुम्ही कल्पना करू शकत नाही अशा सर्व आधुनिक सुविधा… या सर्व गोष्टी जबलपूरमधील आरटीओ कार्यालयात काम करणाऱ्या एआरटीओ अधिकाऱ्याच्या घरात सापडल्या आहेत. एआरटीओ जबलपूर येथे कार्यरत असून त्यांची पत्नी त्याच कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत आहे. ईओडब्ल्यूच्या टीमने बुधवारी संध्याकाळी त्याच्या जबलपूर येथील घरावर छापे टाकण्यास सुरुवात केली, जी अजूनही सुरू आहे. एआरटीओच्या मालमत्तेची चौकशी सुरू आहे. छाप्यादरम्यान त्याच्या घरातून 16 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. यासोबतच पाच घरे आणि फार्म हाऊसची माहिती मिळाली आहे.

घरात सर्व लक्झरी सुविधा
संतोष पाल यांचे जबलपूर येथील घर पाहून तुमचे डोळे विस्फारतील. संतोष पाल यांच्या घरात जेवढ्या सुविधा आहेत, तेवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या घरात देखील नसतील. त्यांच्या घरात लाखो रुपयांचे होम थिएटर, बाथ टब आणि परदेशी ब्रँडचे इंटिरियर आहे. त्यांची किंमत करोडोंमध्ये असू शकते. यासोबतच टाइल्स आणि फिटिंग्जच्या इतर वस्तूही खूप मौल्यवान आहेत. या सर्व गोष्टी पाहून ईओडब्ल्यूचे अधिकारीही अवाक् झाले.

हलवण्यात आले काही सामान
छाप्यादरम्यान त्याची लिपिक पत्नी बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. यासोबतच संतोष पाल याने घरातून काही मौल्यवान वस्तू पळवल्या असून, त्यांची माहिती गोळा केली जात आहे. त्याने माल कुठे हलवला, हे अद्याप समजू शकलेले नाही. EOW टीम त्याचा तपास करत आहे.

अब्जाधीश असू शकतो अधिकारी
ईओडब्ल्यूने रात्री उशिरा विजय नगरमधील संतोष पाल यांच्या शताब्दीपुरम निवासस्थानावर छापा टाकला. रात्री टीमला पाहून संतोष पाल हादरला. संतोष पाल याच्याकडून घर, जमीन, फार्म हाऊस आणि महागड्या मोटार कार, दुचाकी सापडल्या आहेत. संतोष ज्या घरात राहतो, त्या घरात सुख-सुविधांच्या सर्व गोष्टी आहेत. त्यात स्विमिंग पूल, बार आणि मिनी होम थिएटरचा समावेश आहे. यासोबतच अनेक अघोषित संपत्तीही सापडली आहे. शहरात त्याची पाच घरे आणि फार्म हाऊस आहेत.

2012 मध्ये एआरटीओ झाला संतोष पाल
1990 मध्ये एलआयसीमध्ये लिपिक पदावर भरती झालेला संतोष पाल एमपीपीएस परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर 2012 मध्ये एआरटीओ झाला. जबलपूर आरटीओ कार्यालयातच त्यांची पत्नी रेखा पाल लिपिक म्हणून काम करतात. पती-पत्नी मिळून भ्रष्टाचार करत असल्याचे सूत्रांकडून समजते. संतोष पाल अनेक वर्षांपासून जबलपूर आरटीओ कार्यालयात कार्यरत आहे. मंत्री आणि उच्चपदस्थांशी त्याचे चांगले संबंध आहेत.