Russia Demographic Crisis : 10 मुलांना जन्म द्या, 13 लाखांचे बक्षीस मिळवा, पुतिन यांनी जाहीर केला मदर हिरोईन पुरस्कार


मॉस्को: घटत्या जन्मदरामुळे रशिया सध्या लोकसंख्येच्या संकटाचा सामना करत आहे. त्यामुळे देशाची लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे. क्षेत्रफळानुसार रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे, परंतु त्याची लोकसंख्या केवळ 14.41 दशलक्ष आहे. या कारणास्तव रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सोव्हिएत काळातील मदर हिरोईन नावाचा पुरस्कार पुन्हा देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनीही या आठवड्यात या पुरस्काराबाबतच्या सरकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. 10 किंवा त्याहून अधिक मुले जन्माला घालणाऱ्या आणि वाढवणाऱ्या महिलांचा सन्मान म्हणून रशियाची ‘मदर हिरोईन’ ही पदवी दिली जाईल, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

10 व्या मुलाच्या जन्मावर मिळतील 13 लाख रुपये
स्थानिक अहवालात असे म्हटले आहे की 10 व्या हयात असलेले मूल एक वर्षाचे झाल्यावर त्याला 1 दशलक्ष रूबल (सुमारे 13 लाख रुपये) एक-वेळचे पेमेंट देखील मिळेल. यापूर्वीच्या नऊ मुलांपैकी कोणीही दहशतवादी हल्ला किंवा आणीबाणीत मारले गेले, तरी संबंधित आई हा पुरस्कार मिळविण्याची पात्र असेल, असे अहवालात म्हटले आहे. पुतिन यांना विश्वास आहे की या पुरस्काराच्या माध्यमातून रशियामधील लोकसंख्या वाढविण्यात मदत होईल. पालकांनाही मुलांच्या संगोपनासाठी सरकारी मदत मिळू शकेल.

जोसेफ स्टॅलिन यांनी 1944 मध्ये केली होती या पुरस्काराची सुरुवात
मदर हिरोईन पुरस्कार पहिल्यांदा 1944 मध्ये सोव्हिएत नेते जोसेफ स्टॅलिन यांनी सुरू केला होता. त्यावेळी दुसऱ्या महायुद्धामुळे सोव्हिएत युनियनची लोकसंख्या झपाट्याने कमी होत होती. अशा स्थितीत तत्कालीन सरकारने लोकसंख्या वाढीसाठी हा पुरस्कार सुरू केला होता. 1991 मध्ये सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर तत्कालीन रशियन सरकारने हा पुरस्कार बंद केला होता. देशाची लोकसंख्या पुरेशी आहे आणि विघटनाने आर्थिक स्थितीही चांगली नाही, असे कारण त्यावेळी दिले गेले. अशा परिस्थितीत लोकांना रोख रक्कम बक्षीस म्हणून देता येणार नाही.

सातत्याने कमी होत आहे रशियाची लोकसंख्या
अनेक दशकांपासून रशियाची लोकसंख्या सातत्याने कमी होत आहे. 2022 च्या सुरूवातीस, रशियाची लोकसंख्या सुमारे 400,000 ने घटली. सोव्हिएत युनियनच्या विघटनाने रशियाची लोकसंख्या 1990 मध्ये कमी होण्यास सुरुवात झाली. 2000 मध्ये पुतिन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरही लोकसंख्या कमी होत गेली. सुरुवातीला दोन दशकांनंतर लोकसंख्या सुधारेल असे म्हटले जात होते, पण त्याचा परिणाम दिसला नाही. परिस्थिती सुधारण्याचे मागील प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत, ज्यामुळे अर्थशास्त्रज्ञांमध्ये लहान लोकसंख्येच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामाबद्दल चिंता निर्माण झाली.