जे नेतृत्वासाठी आव्हान बनतात त्यांची उचलबांगडी करते भाजप… गडकरींची संसदीय मंडळातून वगळल्यावरुन राष्ट्रवादीचा टोला


मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची संसदीय मंडळातून वगळल्यानंतर राजकारण सुरू झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) गडकरींबद्दल भारतीय जनता पक्षावर (भाजप) जोरदार निशाणा साधला असून, एक कुशल राजकारणी म्हणून त्यांच्या वाढत्या उंचीमुळे त्यांना मंडळातून काढून टाकण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रॅस्टो यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, जेव्हा तुमची क्षमता आणि ऊंची वाढते आणि तुम्ही वरिष्ठांसाठी आव्हान बनता, तेव्हा भाजप तुम्हाला वगळते. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चांगले संबंध असलेले बोलके नेते नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना भाजपच्या संसदीय मंडळात स्थान देण्यात आलेले नाही.

क्रास्टो यांनी ट्विटरवर म्हटले आहे की भाजप संसदीय मंडळात नितीन गडकरी यांचा समावेश न केल्याने कुशल राजकारणी म्हणून त्यांचा दर्जा अनेक पटींनी वाढल्याचे दिसून येते. भाजपच्या सर्वोच्च निर्णय मंडळातून या दोन्ही नेत्यांना वगळणे, हे त्यांच्या घसरत्या राजकीय उंचीचे लक्षण मानले जात आहे. गडकरींचे प्रतिस्पर्धी मानले जाणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीत समावेश करण्यात आला.

गेल्या महिन्यात गडकरींनी केले होते राजकारण सोडण्याचे वक्तव्य
गेल्या महिन्यात, गडकरी म्हणाले होते की, मला कधीकधी राजकारण सोडावेसे वाटते, कारण आयुष्यात अजून बरेच काही करायचे आहे. आजकाल राजकारण हे समाजपरिवर्तनाचे साधन न राहता सत्तेत राहण्यावर अधिक भर देत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.