सुजानसिंग- नौदलाचे वयोवृद्ध अधिकारी झाले १०१ वर्षांचे

हरियानातील करनाल गावाचा गौरव असलेले माजी वरिष्ठ नौदल अधिकारी सुजानसिंग यांनी बुधवारी वयाची १०१ वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्ताने नौसेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना स्पेशल अॅवॉर्ड ,५० हजाराचा चेक देऊन त्यांचा सन्मान केला आहे. नौसेना प्रमुखांनी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा  दिल्या. दिल्ली मुख्यालयातील कमांडिंग ऑफिसर वीरेश दास यांनी त्यांच्या टीमसह सुजानसिंग यांची भेट घेऊन त्यांचा सन्मान केला .

वीरेश दास म्हणाले, ‘सुजान सिंग नेव्हीचे सर्वात जुने अधिकारी आहेत आणि आमच्यासाठी ही गौरवाची बाब आहे. त्यांचे आशीर्वाद आमच्यासाठी मोलाचे आहेत. त्यांनी नौसेनेत असताना देशसेवा केलीच पण निवृत्तीनंतर सुद्धा त्यांनी समाजकार्याच्या माध्यमातून देशसेवा सुरु ठेवली आहे. त्यांनी आजच्या तरुणाईपुढे आदर्श निर्माण केला आहे.’ सुजान सिंग यांचे अॅडव्होकेट सुपुत्र गुरजीत यांनी वडिलांचा अभिमान वाटतो असे सांगितले. ते म्हणाले,’ नौसेनेतून निवृत्ती घेतल्यावर त्यांनी २५ वर्षे गुरुद्वारा मध्ये सेवा केली. त्यांची पेन्शन सामाजिक कार्यासाठीच ते खर्च करतात. त्यांची तब्येत अजूनही चांगली आहे. रोजचे फिरणे आणि रोजची कामे ते स्वतः करतात. १५ ऑगस्ट ला त्यांनीच आमच्या सेक्टर मध्ये तिरंगा फडकवला आहे.

सुजानसिंग यांनी नौदलाकडून केल्या गेलेल्या सन्मानाबद्दल आभार मानताना तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे आणि देशाच्या उत्थानासाठी काम करावे असे सांगितले.