वृंदावनमध्ये मुस्लीम समुदायाकडून बनविले जातात बांकेबिहारी साठी पोशाख

मथुरा वृंदावन मध्ये जन्माष्टमीची तयारी जोरात सुरु असून या गावातील मुस्लीम समाज मोठ्या उत्साहाने बांकेबिहारी म्हणजे कृष्ण कन्हैया साठी आणि राधा गौळणीसाठी पोशाख बनविण्याचे काम करत आहे. विशेष म्हणजे बांकेबिहारी मंदिरापासून अर्धा किमीवर असलेल्या साई मशिदीजवळ श्रीकृष्ण आणि राधेसाठी पोशाख बनविणारे ४० कारखाने असून हे मुख्यत्वे मुस्लीम लोकांचे आहेत. येथे १० हजार मुस्लीम कारागीर रात्रंदिवस काम करून हे पोशाख बनवितात. यातील काही कारखाने ५०-६० वर्षे जुने असून येथे हेच काम प्रामुख्याने केले जाते.

वृंदावन मध्ये फक्त कृष्णराधेचेच नाही तर बहुतेक सर्व हिंदू देवदेवतांचे पोशाख बनविले जातात. जरीची खास कलाकुसर करून बनविले गेलेल्या या पोशाखाना भारतातच नाही तर परदेशातून सुद्धा मोठी मागणी आहे. राधेचा जरीचा लेहेंगा बनविण्यासाठी ७ ते ८ दिवस लागतात आणि त्यांच्या किंमती ८ ते १० हजार पर्यंत आहेत. ४ -५ कामगार दिवसाचे १५-१६ तास एका ड्रेससाठी काम करतात असे समजते.

येथील एक प्रमुख कारखानदार सांगतात, देवाचे पोशाख बनविताना साफसफाई आणि स्वच्छता यांची विशेष काळजी घेतली जाते. वृंदावन मधील पोशाखाना अमेरिका, इंग्लंड, फ्रांस, जपान, नेपाल, थायलंड, इंडोनेशिया येथून सुद्धा ऑर्डर येतात. भारत आणि जगात विकल्या जाणाऱ्या एकूण देव वस्त्रात ९० टक्के हिस्सा वृंदावनचा आहे. साई मशिदीला लागुनच येथे पथवारी देवी मंदिर आहे. त्यामुळे हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही समुदायांचे सण दोन्ही समाज एकत्र येऊन साजरे करतात.