७५ व्या स्वातंत्रदिनी धावली रेल्वेची सुपर वासुकी स्पेशल मालगाडी

दक्षिणपूर्व मध्ये रेल्वेने १५ ऑगस्ट रोजी देशाच्या स्वातंत्र अमृत महोत्सवी वर्षात सुपर वासुकी स्पेशल मालगाडी चालवून विक्रम केला. सहा इंजिन सह आणि २९५ वॅगन सह या गाडीने २७ हजार टन कोळसा वाहून नेला. या गाडीची लांबी ३.५ किमी होती आणि छत्तीसगढ मधील कोरबा पासून नागपूरच्या राजनांदगाव पर्यंत हा प्रवास होता. भारतीय रेल्वेची ही सर्वात वजनदार आणि सर्वात लांब मालगाडी होती.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मालगाडीचा व्हीडीओ शेअर केला असून ‘आझादी का अमृतमहोत्सव ‘ कार्यक्रमाअंतर्गत ही मालगाडी चालविली गेल्याचे म्हटले आहे. ज्या स्टेशनचा व्हिडीओ वैष्णव यांनी शेअर केला ते स्टेशन पार करायला या मालगाडीला ४ मिनिटे लागली. २६७ किमीचा प्रवास या गाडीने ११ तास २० मिनिटात पूर्ण केला. या गाडीतून वाहून नेलेल्या कोळशामुळे ३ हजार मेगावॉटचा प्लांट पूर्ण एक दिवस चालविता येणार आहे. ५ मालगाड्या एकत्र करून ही मालगाडी बनविली गेली होती.

यापूर्वी २२ जानेवारी २०२१ मध्ये अश्याच पाच मालगाड्या एकत्र करून वासुकी नावाने मालगाडी चालविली गेली होती पण तिच्यात माल भरला गेला नव्हता. सुपर वासुकी मालासह चालविली गेली. या पूर्वी अॅनाकोंडा, सुपर अॅनाकोंडा, शेषनाग या मालवाहू ट्रेन रेल्वेने चालविल्या आहेत. त्यात तीन ते ५ मालगाड्या एकत्र केल्या गेल्या होत्या. अश्या अधिक लांबीच्या मालगाड्या चालविण्याचा फायदा म्हणजे स्टाफ कमी लागतो, रेल्वे ट्रॅक वरचा वाहतूक ताण कमी होतो आणि अधिक माल वाहून नेला जातो.