जॅकलीनला सुकेश कडून मिळाली होती कोट्यावधीची गिफ्ट्स

श्रीलंकन वंशाची बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस २०० कोटीच्या मनी लाँड्रीग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर बरोबरच्या संबंधांमुळे चांगलीच अडचणीत आली असून ईडीने तिच्याविरुद्द आरोपपत्र दाखल करण्याची तयारी सुरु केल्याच्या बातम्या आल्या आहेत. सुकेश बरोबरचे तिचे अनेक फोटो प्रसिद्ध झाल्यापासून ईडीने त्याची दखल घेऊन जॅकलीनची चौकशी सुरु केली होती. २०१७ पासून सुकेश जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता आणि त्याकाळातच त्याचे जॅकलीन बरोबरचे फोटो प्रसिद्ध झाले होते.

जॅकलीनला सुकेश कडून आजपर्यंत कोट्यावधीच्या गिफ्ट्स दिल्या गेल्या आहेत. ऑक्टोबर मध्ये ईडीने केलेल्या चौकशीमध्ये जॅकलीनला सुकेशने ५२ लाखांचा अरबी घोडा, प्रत्येकी ९ लाख रुपये किंमतीची तीन पर्शियन मांजरे, हिऱ्याचे १५ झुमके, शिवाय अनेक मौल्यवान खडे जडविलेले ब्रेसलेटस, महागडे शूज, रोलेक्स घड्याळ यांचा समावेश आहे. सुकेशने तिला दीड कोटी रुपये किंमतीची मिनी कुपर कार सुद्धा दिली होती पण जॅकलीनने ही गाडी नंतर परत केली होती. या सर्व भेटी मनी लाँड्रीगच्या पैशातूनच दिल्या गेल्याचा ईडीचा संशय आहे. सुकेशने जॅक्लीनच्या आई आणि बहिणीला सुद्धा बीएमडब्ल्यू कार्स दिल्या आहेत.

ईडीने जॅकलीनच्या निवासस्थानी घातलेल्या छाप्यात ७.२७ कोटींची संपत्ती आणि १५ लाखाची कॅश अगोदरच जप्त केली आहे.