सुकेश चंद्रशेखर प्रकरणात ED ने जॅकलिनला केले आरोपी, अभिनेत्रीच्या अडचणीत वाढ


सुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या आरोपपत्रात जॅकलिन फर्नांडिसचे नाव आरोपी म्हणून ठेवण्यात आले आहे. या अभिनेत्रीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही, कारण न्यायालयाने अद्याप आरोपपत्राची दखल घेतली नसली, तरी तिला देशाबाहेर प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

काय आहे प्रकरण?
सुकेश चंद्रशेखरवर 200 कोटी रुपयांची वसूली केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाच्या तपासात सुकेशने जॅकलिनला महागड्या भेटवस्तू दिल्याचे समोर आले आहे. त्यानंतर ईडीने त्याच्यावर कारवाई करत त्याची 7 कोटी रुपयांची संपत्तीही जप्त केली आहे. सुकेश चंद्रशेखरची सहकारी पिंकी इराणी हिने सुकेशला जॅकलीनला भेटायला लावल्याचेही आरोपपत्रात उघड झाले आहे. आणि सुकेश चंद्रशेखरने पिंकी इराणीच्या मदतीने जॅकलिनला महागड्या भेटवस्तू आणि रोख रक्कम दिली होती.

काय आहेत जॅकलिनवर आरोप?
सुकेश चंद्रशेखरने डिसेंबर 2020 ते जानेवारी 2021 दरम्यान जॅकलिन फर्नांडिसशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु अभिनेत्रीने त्याच्या कॉलला प्रतिसाद दिला नाही, असेही ईडीच्या चार्टशीटने उघड केले. अभिनेत्रीने आरोप केला आहे की सरकारी कार्यालयातील कोणीतरी तिच्याशी संपर्क साधला आणि तिला शेखर रत्न वेला म्हणून ओळखत असलेल्या सुकेश चंद्रशेखरशी संपर्क साधण्यास सांगितले.

सुकेशने सांगितली चुकीची ओळख
अभिनेत्रीने पुढे खुलासा केला की जेव्हा तिने सुकेशशी संपर्क साधला, तेव्हा त्याने स्वतःला त्याच्या कुटुंबासह सन टीव्हीचा मालक म्हणून सांगितले. आपण जयललिता यांच्या राजकीय कुटुंबातील असून त्या चेन्नई येथील असल्याचेही त्यांनी सांगितले. जॅकलिन म्हणाली, सुकेश म्हणाला होता की तो माझा खूप मोठा चाहता आहे आणि मी दाक्षिणात्य चित्रपट करावेत आणि सन टीव्हीच्या रूपाने त्याच्याकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत. तेव्हापासून दोघेही संपर्कात आले होते.