स्वस्तिक चिन्हावर ऑस्ट्रेलियात बंदी

हिंदू धर्मियांचे पवित्र चिन्ह गेले काही दिवस जगात चुकीच्या कारणांनी चर्चेत आले असून ऑस्ट्रेलियातील दोन राज्यांनी स्वस्तिक चिन्हावर बंदी घातली आहे. या राज्यांनी स्वस्तिक हे नाझींचे प्रतिक मानले असून ते क्रूरता दर्शविते असे म्हटले आहे. कोणत्याही स्वरुपात स्वस्तिक चिन्ह दाखविणे हा गुन्हा ठरविला गेला असून तो करणाऱ्याला २२ हजार ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजे १२ लाख रुपये दंड, १२ महिने कैद किंवा दोन्ही शिक्षाची तरतूद केली गेली आहे.

अर्थात ऑस्ट्रेलियामध्ये ही बंदी अचानक घातली गेलेली नाही तर गेले वर्षभर विविध समुदायांशी चर्चा, वादविवाद घडवून आणल्यानंतर त्या बाबतचा निर्णय घेतला गेल्याचे सांगितले जात आहे. या चिन्हाने ज्यू समाजाचे फार मोठे नुकसान केल्याचे प्रतिपादन केले गेले आहे. ऑस्ट्रेलियाच्या साउथ वेल्स आणि व्हिक्टोरिया या राज्यांनी स्वस्तिकवर बंदी घातली आहे तर क्वीन्सलंड, तम्मानिया मध्येही बंदीचा विचार सुरु आहे.

काही महिन्यांपूर्वी कॅनडा मध्येही स्वस्तिक बाबत असेच पाउल उचलले गेले होते मात्र हिंदू समुदायाच्या तीव्र विरोधानंतर कॅनडा सरकारने माफी मागितली होती. जुलै मध्ये फिनलंड सरकारने त्यांच्या हवाई दलाच्या प्रतीकावरून स्वस्तिक हटविले आहे.

स्वस्तिक हे हिंदू धर्माचे पवित्र प्रतीक आहे. स्वस्तिका या संस्कृत शब्दावरून स्वस्तिक हा शब्द आला आहे. या आकृतीच्या चारी भुजा ९० अंशांच्या कोनात असतात. हिंदू धर्मात स्वस्तिक हे समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतिक आहे.