ओमिक्रोनचे सबवेरीयंट सेंटोरस जागतिक व्हेरीयंट बनणार?

भारतात गेल्या काही दिवसात करोना संक्रमितांची संख्या वाढती असून वैज्ञानिकांना ओमिक्रोनचे नवे सबव्हेरीयंट सेंटोरस (बीए २.७५) जागतिक करोना व्हेरीयंट बनेल अशी भीती वाटते आहे. हे नवे व्हेरीयंट अतिशय वेगाने फैलावत आहे. आत्ताच जगातील २० देशांत त्याचा प्रसार झाला आहे. मात्र भारतातील लोकांची चांगली रोगप्रतिकार शक्ती आणि लसीकरण यामुळे त्याचा प्रभाव कमी राहील असे सांगितले जात आहे. या व्हेरीयंट चे संक्रमण अतिशय वेगाने होते हे खरे असले तरी संक्रमिताना हॉस्पिटल मध्ये नेण्याची वेळ येत नाही असेही दिसून आले आहे.

नेचर जर्नलच्या एका रिपोर्ट मध्ये सेंटोरस म्हणजे बीए २.७५वर वैज्ञानिक बारीक लक्ष ठेऊन आहेत. ओमिक्रोनच्या या नव्या व्हेरीयंटचा जुलै पासून भारतात वेगाने प्रसार झाला आणि मग आशिया आणि युरोप मधील २० देशात हा विषाणू पोहोचला आहे. भारतात मे पासून आत्तापर्यंत १ हजार नमुन्यांचे जीनोम सिक्वेन्सिंग केले गेले असून त्यात २/३ केसेस बीए २.७५ च्या आहेत.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री राजेश भूषण म्हणाले दिल्ली मध्ये सर्वाधिक केसेस आढळल्या असल्या तरी हे प्रमाण आता स्थिरावले आहे. रिपोर्ट नुसार बीए २.७५ मध्ये एक म्युटेशन ‘ए ४५२ आर’ आढळले आहे आणि त्यामुळे दुसऱ्यांदा संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे. नवे व्हेरीयंट जागतिक व्हेरीयंट बनले तरी त्याचा प्रभाव कमी असेल असेही सांगितले जात आहे.