एफबीआयवर ट्रम्प यांचे पासपोर्ट चोरल्याचे आरोप

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या मार ए लोगो इस्टेटीवर अमेरिकेची तपास यंत्रणा एफबीआयने घातलेल्या छाप्यात त्यांचे तीन पासपोर्ट चोरून नेल्याचा आरोप केला आहे. यावेळी एफबीआयने १५ पेट्या भरून कागदपत्रे नेल्याचे ट्रम्प यांनी म्हटले असून यात काही महत्वाची रेकॉर्ड होती असाही आरोप केला आहे. गेल्या मंगळवारी कोणतीही पूर्वसूचना न देता आणि ट्रम्प न्यूजर्सी येथे असताना त्यांच्या या मालमत्तेवर एफबीआयने छापे घातले होते.

सोमवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ’ या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरून या छाप्यात एफबीआयने त्यांचे तीन पासपोर्ट चोरल्याचे म्हटले असून त्यातील एका पासपोर्टची मुदत संपली होती असे नमूद केले आहे. राजकीय प्रतिस्पर्ध्यावर केला गेलेला हा सर्वात घाणेरडा हल्ला असल्याचे आणि यापूर्वी कोणत्याच अमेरिकी अध्यक्षांना अशी वागणूक दिली गेली नसल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. न्यायव्यवस्थेचा हा गैरवापर असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे मात्र एफबीआयने या कोणत्याच आरोपाला काहीच उत्तर दिलेले नाही.