आणखी १२ शहरात सुरु होणार लुलू मॉल

उत्तरप्रदेशची राजधानी लखनौ मध्ये सुरु झालेल्या लुलू मॉलला अल्पावधीत मिळालेली लोकप्रियता लक्षात घेऊन भारताच्या अन्य १२ शहरात लवकरच मॉल सुरु करण्यात येत असल्याचे घोषणा लुलू ग्रुप इंडियाचे प्रमुख थिबू फिलिप्स यांनी केली आहे. लुलू हा युएईचा मोठा ग्रुप भारतात व्यवसाय विस्तार करण्याच्या दृष्टीने वाटचाल करत आहे. भारतीय होलसेल क्षेत्रात व्यवसाय वाढीला मोठी संधी आहे हे लक्षात घेऊन ही पावले टाकली जात असल्याचे फिलीप यांनी सांगितले. ते म्हणाले लुलूने आत्तापर्यंत ७ हजार कोटींची गुंतवणूक करून  भारतात पाच मॉल्स सुरु केले आहेत. कोची, त्रिवेंद्रम, त्रिसूर, बंगलोर आणि लखनौ मध्ये पाच मॉल सुरु आहेत आणि त्यानंतर आणखी १२ शहरात असे मॉल लवकरच सुरु केले जात आहेत.

फिलीप म्हणाले भारतीय बाजाराचा अजून पुरेसा वापर होत नसल्याचे दिसून आले आहे. होलसेल बाजारात संघटीत हिस्सेदारी फक्त १२ टक्के आहे आणि यामुळे या बाजारात आम्हाला मोठी संधी आहे. भारतात तरुण संख्या जास्त आहे परिणामी प्रती व्यक्ती उत्पन्न आणि उपभोग क्षमता जास्त आहे. केरळच्या कालिकत, कोट्टायम, तीरूर, पेरीन्थालमन्ना, पलक्कड, चेन्नई, अहमदाबाद, प्रयागराज, वाराणसी, बंगलोर येथे नवे मॉल सुरु केले जातील तसेच हैद्राबाद येथील मॉलचे नुतनीकरण केले जात आहे.

लुलू ग्रुप या मल्टीनॅशनल कंपनीचे मुख्यालय युएईच्या अबुधाबी मध्ये असून लुलू या अरबी शब्दचा अर्थ मोती असा आहे. त्यांचा पहिला मॉल अबुधाबी मध्ये सुरु झाला होता आणि आज या ग्रुपची वर्षाची उलाढाल ८ हजार अब्ज डॉलर्स आहे. २२ देशात त्यांचा व्यवसाय पसरला असून त्यातून ५७ हजार लोकांना रोजगार मिळाला आहे.