राज्यात राजकीय उलथापालथीनंतर शिंदे गटाची पहिलीच शाखा, उद्धव ठाकरेंचा फोटो नाही!


मुंबई : मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर प्रभाग क्रमांक 143 मध्ये सुरू झालेल्या शिंदे गट शाखेत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो लावण्यात आलेले नाही. शाखेच्या बाहेर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे, तर शाखेच्या आत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे.

शिंदे गटाच्या शाखेचे उद्घाटन करताना शेवाळे म्हणाले की, मुंबई शहरातील ही पहिलीच शाखा आहे. जेथून मुंबई शहरात प्रवेश होतो. या ठिकाणी शाखेचे उद्घाटन झाले ही अतिशय आनंदाची बाब आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा भगवा पसरवण्याचा आमचा संकल्प आहे. मुंबईतील प्रत्येक प्रभागात शिवसेनेची शाखा सुरू करण्यात येणार आहे.

शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरही केला दावा
शिवसेनेतील बंडखोरीनंतर 40 आमदार आणि 12 खासदार एकनाथ शिंदे गटात सामील झाले. यासोबतच अनेक नगरसेवक आणि पदाधिकारीही शिंदे गटात सामील झाले. खरी शिवसेना आमचीच असून आम्हाला बहुमत असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. त्यासाठी शिंदे गटाने पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह धनुष्यबाणावर दावा केला आहे. सध्याच्या घडीला खरी शिवसेना कोण? हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. आता एकनाथ शिंदे गटाने दादर परिसरात शिवसेना भवन बांधून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान दिले आहे.