CSA T20 League : धोनी नसणार चेन्नई सुपर किंग्जचा मेंटॉर, बीसीसीआयने दिली नाही परवानगी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण


नवी दिल्ली – आयपीएलमध्ये चार वेळा चॅम्पियन ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने दक्षिण आफ्रिका क्रिकेट लीगमध्येही संघ विकत घेतला आहे. संघाच्या मालकाला महेंद्रसिंग धोनीला मेंटॉर बनवायचे होते, पण त्यांचे स्वप्न भंग पावू शकते. वृत्तानुसार, बीसीसीआय चेन्नई संघाला यासाठी परवानगी देणार नाही. धोनी सध्या चेन्नईचा कर्णधार असून त्याच्या नेतृत्वाखाली संघाने चार वेळा विजेतेपद पटकावले आहे.

दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये, चेन्नईच्या मालकांना धोनीने त्यांच्या संघाचे मार्गदर्शन करावे असे वाटते, परंतु BCCI त्यांच्या खेळाडूंना परदेशी T20 लीगमध्ये सामील होऊ देत नाही. याच कारणामुळे धोनीला दक्षिण आफ्रिका क्रिकेट लीगमध्ये चेन्नईचा मेंटॉर बनण्याची परवानगी मिळणे खूप अवघड आहे. या लीगमधील सर्व सहा फ्रँचायझी आयपीएलच्या संघांनी विकत घेतल्या आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे की, जर कोणत्याही भारतीय खेळाडूला कोणत्याही परदेशी लीगमध्ये सहभागी व्हायचे असेल, तर त्याला करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी बीसीसीआयसोबतचे सर्व करार रद्द करावे लागतील. त्यानंतरच तो परदेशी लीगमध्ये कोणत्याही प्रकारच्या करारावर स्वाक्षरी करू शकेल.

काय म्हणाले अधिकारी
“हे स्पष्ट आहे. देशांतर्गत खेळाडूंसह कोणत्याही भारतीय खेळाडूला परदेशी टी-20 लीगचा भाग व्हायचे असेल, त्याला बीसीसीआयशी असलेले सर्व संबंध तोडावे लागतील, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, धोनीने दोन वर्षांपूर्वीच भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट लीगमध्ये खेळण्यासाठी धोनीला आयपीएलमधून निवृत्ती घ्यावी लागेल आणि बीसीसीआयशी असलेले सर्व संबंध तोडावे लागतील, असे होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.

कार्तिकला मागावी लागली माफी
2019 मध्ये, दिनेश कार्तिकने त्रिनिबागो नाइट रायडर्सच्या डगआउटमध्ये बसून कॅरिबियन प्रीमियर लीगमधील एक सामना पाहिला. कोलकाताचे नवे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्क्युलम यांनी त्यांना सामना पाहण्यासाठी आमंत्रित केले होते. या प्रकरणी कार्तिकला नंतर बीसीसीआयची माफी मागावी लागली. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अॅडम गिलख्रिस्टनेही याप्रकरणी नाराजी व्यक्त केली होती. गिलख्रिस्ट म्हणाला होता की, मी आयपीएलवर टीका करत नाही, पण भारतीय खेळाडू बिग बॅश लीगमध्ये का खेळू शकत नाहीत. या प्रश्नाचे समर्पक उत्तर त्याला कधीच मिळाले नाही.