Iran On Salman Rushdie : सैतान, अल्लाहचा शत्रू… इराणी वृत्तपत्रांनी जखमी सलमान रश्दींविरुद्ध प्रकाशित केला द्वेष, हल्लेखोराला म्हटले ‘हीरो’


तेहरान : भारतीय वंशाचे लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये शुक्रवारी चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. रश्दी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्राणघातक हल्ल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे, मात्र इराणमध्ये त्याचे समर्थन केले जात आहे. शनिवारी अनेक इराणी वृत्तपत्रांमध्ये या हल्ल्याचा उल्लेख करण्यात आला होता, परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे या वृत्तपत्रांनी रश्दींना रक्तबंबाळ करणाऱ्या हल्लेखोर हादी मातरला पाठिंबा दिला. सलमान रश्दी यांनी 1988 मध्ये ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ नावाचे पुस्तक लिहिले. 1989 मध्ये इराणने त्याच्या विरोधात मृत्यूचा फतवा जारी केला होता, त्यानंतर त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या.

रश्दी यांच्यावरील हल्ल्याबाबत इराणकडून सध्या कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. इराणचे वृत्तपत्र कायहान, ज्यांचे मुख्य संपादक इराणच्या सर्वोच्च नेत्याने नियुक्त केले आहेत, त्यांनी लिहिले: ‘न्यूयॉर्कमध्ये सैतान सलमान रश्दीवर हल्ला करणाऱ्या शूर आणि कर्तव्यदक्ष माणसाला हजार सलाम.’ वृत्तपत्राने लिहिले की, ‘अल्लाहच्या शत्रूची मान कापणाऱ्याच्या हाताचे चुंबन घेतले पाहिजे.’

‘नरकाच्या मार्गावर आहे सैतान’
वतन इमरोज या वृत्तपत्राचा मथळा होता, ‘सलमान रश्दीच्या मानेवर चाकू’. त्याचवेळी खोरासान डेलीने या बातमीसाठी ‘सैतान नरकाच्या मार्गावर आहे’ अशी हेडलाईन लिहिली आहे. रश्दी यांच्यावर हल्ला करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. न्यूयॉर्क पोलिसांनी हल्लेखोराची ओळख पटवली असून तो न्यू जर्सीचा रहिवासी आहे. रश्दींच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्याने पास खरेदी केला होता. जगभरात ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर’ हल्ला असे या हल्ल्याचे वर्णन केले जात आहे.

33 वर्षांपूर्वी काढण्यात आला होता फतवा
इराणचे तत्कालीन सर्वोच्च नेते अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांनी 14 फेब्रुवारी 1989 रोजी रश्दी यांच्या विरोधात फतवा जारी केला होता. खोमेनी यांनी त्यांच्या ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ या पुस्तकासाठी रश्दींच्या हत्येचा फतवा काढला आणि लेखकाने त्यांच्या पुस्तकात इस्लामचा अपमान केल्याचा आरोप केला. त्यांच्या फतव्यात खोमेनी यांनी “संपूर्ण जगभरातील मुस्लिमांना पुस्तकाच्या लेखक आणि प्रकाशकाला मारण्याचे आवाहन केले होते, जेणेकरून भविष्यात कोणीही इस्लामचा अपमान करण्यास धजावणार नाही.