Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरातून एफबीआयला मिळाली ‘टॉप सीक्रेट’ कागदपत्रे, अडचणीत होणार वाढ


वॉशिंग्टन – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा राज्यातील घरातून फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) ने काही ‘टॉप सीक्रेट’ सरकारी कागदपत्रे जप्त केली आहेत. अमेरिकेच्या न्याय विभागाने शुक्रवारी सांगितले की एफबीआय एजंट्सनी या आठवड्यात ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील घराची झडती घेतली आणि काही गोपनीय कागदपत्रे जप्त केली. ही कागदपत्रे अण्वस्त्रांशी संबंधित होती. आता या खुलाशामुळे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी आगामी काळात वाढू शकतात.

ट्रम्प यांनी केले कायद्याचे उल्लंघन
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर त्यांच्या निवासस्थानी गुप्त कागदपत्रे ठेवून हेरगिरी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. फेडरल मॅजिस्ट्रेटने मंजूर केलेल्या वॉरंटच्या आधारे एफबीआय एजंटांनी ट्रम्प यांच्या निवासस्थानाची झडती घेतली. चार दिवसांनंतर एजन्सीने जारी केलेल्या निवेदनात कायदेशीर कागदपत्रांबाबत अनेक आश्चर्यकारक खुलासे करण्यात आले आहेत.

ट्रम्प यांच्या वाढू शकतात अडचणी
तपास अधिकाऱ्यांनी यूएस मॅजिस्ट्रेट न्यायाधीश ब्रूस रेनहार्ट यांना त्यांच्या वॉरंट अर्जात सांगितले की ट्रम्प यांनी हेरगिरी कायद्याचे उल्लंघन केले आहे, असे मानण्याचे संभाव्य कारण आहे. त्याच वेळी, ट्रम्प यांच्याशी सर्वोच्च गुप्त स्तरावरील कागदपत्रांचा खुलासा त्यांच्यासाठी मोठा कायदेशीर धोका निर्माण करू शकतो.

होऊ शकते पाच वर्षांपेक्षा कमी कारावासाची शिक्षा
पुढे, अमेरिकेच्या न्याय विभागाने सांगितले की, जी कागदपत्रे विशेष सरकारी सुविधांमध्ये सुरक्षित ठेवायला हवी होती, ती ट्रम्प यांच्याकडे कशी होती? तसेच अशा प्रकारे राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर हानी पोहोचू शकते, असे सांगितले. दुसरीकडे, या प्रकरणात ट्रम्प दोषी आढळल्यास त्यांना किमान पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

चुकीच्या हातात पडू शकतात कागदपत्रे
अलीकडेच, यूएस फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (FBI) ने अण्वस्त्रांशी संबंधित कागदपत्रे शोधण्यासाठी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडातील निवासस्थानावर छापा टाकला. ट्रम्प यांनी त्यांचे सरकार सोडल्यानंतर नवीन सरकारकडे कागदपत्रे न दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील घरी कागदपत्रे चुकीच्या हातात पडण्याची शक्यता सरकारी अधिकाऱ्यांना वाटत आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही कागदपत्रे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहेत.