राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डीपीवर लागला तिरंगा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्याच्या ट्वीटर हँडलवरचा डीपी बदलून तेथे तिरंगा लावला आहे. त्याचबरोबर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि महासचिव दत्तात्रय होसबाळे यांच्यासह अनेक संघनेत्यांनी  त्यांच्या सोशल मिडिया हँडलच्या डीपीवर तिरंगा लावला आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट या काळात ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरु केले गेले असून पंतप्रधान मोदी यांनी २ ऑगस्ट रोजीच त्यांच्या ट्वीटर आणि फेसबुक अकौंटवर’ आजचा दिवस विशेष आहे, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत, ‘हर घर तिरंगा’ सामुहिक आंदोलनासाठी तयार रहा. मी डीपी बदलला तुम्हीही बदला’ असे आवाहन केले होते.

मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देताना अनेक नेत्यांनी त्याच्या डीपीवर तिरंगा लावला होता पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने किंवा सरसंघचालकांनी त्यांच्या डीपीवर तिरंगा न लावल्याने विरोधकांनी टीकेची झोड उठविली होती. आरएसएस डीपीवर तिरंगा कधी लावणार अशी कुत्सित विचारणा होऊ लागली होती. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संघाने ५२ वर्षात त्यांच्या मुख्यालयावर कधीच राष्ट्रीय ध्वज फडकवला नाही हा तिरंग्याचा अपमान असल्याचे म्हटले होते. मात्र संघाने त्यांच्यावर झालेले सगळे आरोप बिनबुडाचे असल्याचा खुलासा केला होता.