आज जागतिक ‘लेफ्ट हँडर्स डे’, डावऱ्यांच्या यादीत हे मान्यवर

१३ ऑगस्ट हा दिवस जागतिक लेफ्ट हँडर्स डे म्हणून साजरा केला जातो. समाजात डावऱ्या व्यक्तींसंबंधी असलेली उपहासाची भावना दूर व्हावी आणि त्यांच्या अडचणीबाबत जनजागृती व्हावी असा उद्देश त्यामागे आहे. वास्तविक डॉक्टर्स, मनोवैज्ञानिक यांच्या म्हणण्यानुसार डावरी माणसे युनिक असतात. या व्यक्ती आपले म्हणणे योग्य प्रकारे मांडू शकतात. प्रभावशाली असतात आणि लिहिण्यापेक्षा बोलण्यात अधिक सावध असतात. मित्रांमध्ये त्या लोकप्रिय असतात आणि नवीन काही निर्मिती करणाऱ्या असतात.

जगातील अश्या प्रसिद्ध व्यक्ती पहिल्या तर असे दिसते कि या व्यक्तींनी खरोखरच काही खास मिळविले आहे. प्रत्यक्षात त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते तरी त्यातूनही ते विशेष काही मिळवितात. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, टाटा उद्योगसमुहाचे प्रमुख रतन टाटा, बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन, मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकर, सौरभ गांगुली, कॉमेडी शो चा कपिल शर्मा, दिग्दर्शक करन जोहर हे लेफ्टी आहेत. तर अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, अॅपलचा स्टीव्ह जॉब्स, फेसबुकचा मार्क झुकेरबर्ग, युथ आयकॉन जस्टीन बिबर, ऑपरा विनफ्रे, सिंगर लेडी गागा इतकेच नव्हे तर नेपोलियन, लीयोनार्डो विन्ची हे विदेशी डावरे आहेत. मोदींच्या बाबतीत मात्र ते दोन्ही हातांचा सारखाच वापर करताना दिसतात.

या लोकांचा मेंदू विशेष तेज असतो आणि कला क्रीडा क्षेत्रात या व्यक्तींना विशेष रस असतो. जगात डावऱ्याची संख्या पाच टक्केच आहे. त्यामुळे त्यांच्या सोयीचा विशेष विचार केला जात नाही. परिणामी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. उदाहरणार्थ संगणक वापरताना माउस सेटिंग बदलावे लागते, शाळेत बाकावर दुसऱ्या मुलांशेजारी बसताना लिहिण्याची अडचण होते. मेट्रो प्रवास एन्ट्री व एग्झीट मशीन कार्ड स्लॉट बहुतेक वेळा उजव्या बाजूला असतो, तेथेही या लोकांना कार्ड प्रेस करताना अडचण येते. वाद्ये शिकताना अवघड जाते.

१३ ऑगस्ट हा जागतिक लेफ्ट हँडर्स डे १९९२ पासून साजरा केला जात आहे. एखादा माणूस डावरा असेल तर त्याला उजव्या हाताने काम करण्याची जबरदस्ती केली जाता कामा नये, यामुळे त्या व्यक्ती गोंधळून जातात आणि त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. त्याऐवजी या लोकांना समजून घेणे अधिक आवश्यक असल्याचे डॉक्टर्स सांगतात.