हर घर तिरंगा- पोस्टाने केले ध्वज विक्रीचे रेकॉर्ड

हर घर तिरंगा अभियानात भारतीय टपाल विभागाने १० दिवसात १ कोटींपेक्षा अधिक ध्वज विक्री करून नवे कीर्तिमान स्थापित केले. प्रती २५ रुपये दराने पोस्टाने त्यांच्या देशभरातील दीड लाख ऑफिसेस आणि सर्वव्यापी नेटवर्क च्या माध्यमातून हे रेकॉर्ड नोंदविलेच पण देशातील प्रत्येक नागरीकामध्ये या अभियान जागृतीचे काम सुद्धा केले आहे. या संदर्भात टपाल विभागाकडून एक पत्रक गुरुवारी प्रकाशित करण्यात आले आहे.

पोस्टाने त्यांच्या या ध्वजविक्री कार्यक्रमात ऑनलाईन मागणी केल्यास पूर्ण देशात कुठेही, कोणत्याही पत्त्यावर ध्वज निःशुल्क पोहोचविण्याची सुविधा दिली होती. नागरिकांनी ई पोस्ट सेवेचा लाभ घेऊन पावणेदोन लाखांपेक्षा अधिक ध्वज ऑनलाईन खरेदी केले. देशभरात ४.२ लाख पोस्टमननी शहरे, नगरे, गावे, खेडी, पाडे, पहाडी भाग, सीमाभागात, नक्षलवादी भागात या अभियान संदेशाचा प्रचार केला. या शिवाय प्रभात फेरी, बाईक रॅली, चौक सभा यातून सुद्धा समाजात संदेश देण्याचे काम केले. डिजिटल स्वरुपात नागरिकांना कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी पोस्टाने फेसबुक, ट्वीटरचाही वापर केला आहे.