सॅनफ्रान्सिस्को मेट्रो स्टेशनवर नवा गार्ड, हा ससाणा घालतोय गस्त

कॅलिफोर्नियाच्या सॅनफ्रान्सिस्को येथील एल सेरीतो डेल नॉर्ट मेट्रो स्टेशनवर सध्या कबुतरांनी उच्छाद मांडला आहे. प्रवासी त्यामुळे हैराण झाले आहेत. परिणामी या स्टेशनवर एक स्पेशल गार्ड तैनात केला असून हा गार्ड म्हणजे एक बहिरी ससाणा आहे. पाच वर्षाचा हा गार्ड पीएसी मॅन रिकी आर्टीज, फाल्कन फोर्स व पीएसी मॅन हँडलर सह स्टेशन वर आठवड्यातून तीन वेळा गस्त घालतो आहे. विशेष म्हणजे त्याच्या उपस्थितीमुळे कबुतराचा त्रास बऱ्यापैकी कमी झाल्याचा दावा केला जात आहे.

या उन्हाळ्यात या स्टेशनवर कबुतरे आणि अन्य पक्षी मोठ्या संख्येने आले असून त्याचा थेट त्रास प्रवासी आणि रेल्वे प्रशासनाला होतो आहे. यावर उपाय म्हणून या शिकारी ससाण्यासह स्टेशनवर गस्त सुरु केली गेली आहे. त्यामुळे स्टेशनवरची कबुतरे घाबरली आहेत आणि कबुतरांची संख्या निम्म्याने कमी झाली आहे. जवळजवळ अर्धी कबुतरे गायब झाली आहेत. प्रवाशांना या ससाण्याला काहीही खाऊ देण्यास बंदी केली गेली आहे.

मात्र गस्ती पथक वेळोवेळी या ससाण्याला त्याचा आहार दिला जाईल याची पुरेपूर काळजी घेत आहे असे समजते.